कचरा पेटतोय दुकानदारांचा अन् जीव जातोय झाडांचा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:35 AM2021-01-22T04:35:25+5:302021-01-22T04:35:25+5:30
सातारा : डोंगरकपारीतील वृक्ष वणव्यात होरपळत असताना आता सातारा शहरातील वृक्षांनाही आगीच्या झळा बसू लागल्या आहेत. येथील दुकानदारांकडून झाडांखाली ...
सातारा : डोंगरकपारीतील वृक्ष वणव्यात होरपळत असताना आता सातारा शहरातील वृक्षांनाही आगीच्या झळा बसू लागल्या आहेत. येथील दुकानदारांकडून झाडांखाली मोठ्या प्रमाणात कचरा पेटविला जात असल्याने या आगीत वृक्ष खाक होत आहेत. बसस्थानक परिसरात गुरुवारी सकाळी अशीच एक घटना घडली. मात्र, वाहतूक पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे झाड जळण्यापासून बचावले.
सातारा पालिकेने ठेकेदाराच्या माध्यमातून शहरात तब्बल नऊ हजार वृक्षांची लागवड केली आहे. शहरातील राजपथ, जिल्हा रुग्णालय मार्ग, तहसील कार्यालय, बसस्थानक, वायसी कॉलेज रोड आदी ठिकाणी दोन वर्षांपूर्वी विविध जातींची झाडे लावण्यात आली. वृक्षलागवड व संगोपनाची जबाबदारी संबंधित ठेकेदाराची होती. दोन वर्षांच्या कालावधीत काही वृक्षांनी माना टाकल्या, तर काही आजही डामडौलपणे उभे आहेत. हे वृक्ष सध्या अनेक दुकानदारांना, वाहनधारकांना अडसर ठरू लागले आहेत. त्यामुळे कोणत्या ना कोणत्या कारणाने हे वृक्ष पाडण्याचे काम संबंधितांकडून केले जात आहे.
बसस्थानक परिसरातील दुकानदार दुकानातील सर्व कचरा फूटपाथ, रस्त्यावर व झाडाखाली टाकत आहेत. पालिकेकडून हा कचरा वेळोवेळी उचलला जातो. गुरुवारी सकाळी हा कचरा उचलण्यापूर्वीच अज्ञाताकडून पेटविण्यात आला. कचऱ्यात प्लास्टिक मोठ्या प्रमाणात असल्याने आगीची तीव्रता वाढत गेली आणि या आगीची झळ एका वृक्षाला बसली. ही घटना निदर्शनास येताच वाहतूक शाखेच्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पाणी टाकून ही आग विझविण्यात आल्याने झाड जळण्यापासून बचावले. दरम्यान, असे प्रकार सातत्याने वाढू लागल्याने पर्यावरणप्रेमींमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
(कोट)
झाडांचे संगोपन करणे सर्वांची जबाबदारी आहे. पालिका प्रशासन यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहे. त्यामुळे विक्रेते, दुकानदार यांनीही जबाबदारीचे भान ठेवावे. रस्त्यावर इतरत्र कचरा न टाकता तो संकलित करून ठेवावा. कचरा पेटविणे योग्य नाही.
-प्रशांत आहेरराव, माजी नगरसेवक
फोटो : २१ जावेद ०८
साताऱ्यातील बसस्थानक परिसरात एका वृक्षाखाली पेटविण्यात आलेला कचरा पोलीस कर्मचाऱ्यांकडून विझविण्यात आला. (छाया : जावेद खान)