कास तलावावरील कचरा ठरतोय जीवघेणा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:39 AM2021-03-26T04:39:18+5:302021-03-26T04:39:18+5:30
पेट्री : शहराच्या पश्चिमेस जिल्ह्यातील प्रमुख पर्यटनस्थळ ओळखल्या जाणाऱ्या कास तलावावर सर्रास पार्ट्या होऊन अर्धवट, खरखटे अन्न चिकटून ठिकठिकाणी ...
पेट्री : शहराच्या पश्चिमेस जिल्ह्यातील प्रमुख पर्यटनस्थळ ओळखल्या जाणाऱ्या कास तलावावर सर्रास पार्ट्या होऊन अर्धवट, खरखटे अन्न चिकटून ठिकठिकाणी पडलेले प्लॅस्टिक, कागद, थर्माकॉल डिशेस, ग्लास मुक्या जनावरांकडून चघळून खाल्ले जात असल्याने हा कचरा मुक्या जनावरांना जीवघेणा ठरत असल्याचे चित्र दिसत आहे. पर्यावरणाला धोका पोहोचवणारा हा कचरा पूर्णत: थांबला जावा, यासाठी या परिसरात जनजागृतीपर माहिती फलक लावले जावेत तसेच होणाऱ्या पार्ट्यावर अटकाव येण्यासाठी सुरक्षारक्षक नेमावा, अशी मागणी होत आहे.
कास तलाव या पर्यटनस्थळी पर्यटकांची दिवसेंदिवस वर्दळ वाढत असून, ओल्या-सुक्या पार्ट्या होत आहेत. प्लास्टिक ग्लास, बाटल्या, पिशव्या, कागदी ग्लास, प्लेटा, कुरकुरे, वेफर्स स्नॅक्सची पाकिटे मोठ्या प्रमाणावर इतरत्र पडलेले दिसत आहेत. परिसरातील मुक्या जनावरांकडून अन्न म्हणून हा कचरा खाल्ला जात असल्याने पोटात तसाच राहतो. साधारण २० ते २५ किलोपर्यंत हा कचरा पोटात साठल्याने जनावरांना ताप येणे, भूक मंदावणे असे दुष्परिणाम घडून त्यांचा अकाली मृत्यू होऊ शकतो. तलावाचा संपूर्ण परिसर दाट झाडी जंगलाचा असल्याने या परिसरातील रानगवा, भेकरं, रानडुक्कर, बिबट्या आदींसारखे अनेकविध पाण्यावर येणारे वन्यजीव खरखटे व उष्ट अन्न खाण्याच्या हेतूने प्लॅस्टिक कचरा खाण्याचा संभव अधिक आहे. अविघटनशील कचऱ्याने मुक्या जनावरांच्या जीवितास धोका उद्भवण्याचा संभव अधिक असल्याचे बोलले जात आहे. यामुळे पार्ट्या करणाऱ्यांकडून हा कचरा होऊ नये. तसेच होणारा कचरा इतरत्र टाकू न देता तो आपल्यासमवेत घरी माघारी नेऊन त्याची योग्य ती विल्हेवाट लावली जावी असे बोलले जात आहे. मुक्या जनावरांच्या जिवावर बेतेल असे कोणतेही विघातक कृत्य करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पर्यावरणप्रेमींतून होत आहे.
(कोट )
कास तलाव पर्यटनस्थळी पार्ट्या झोडून पर्यटकांकडून होत असलेला कचरा मुक्या जनावरांकडून चघळला जात असल्याने त्यांचे आरोग्य धोक्यात येऊन मृत्युचाही संभव आहे. यामुळे परिसरात कसलाही कचरा होणार नाही याची दक्षता प्रत्येक पर्यटकाने घेणे गरजेचे आहे.
-डॉ. योगेश माळी, पशुवैद्यकीय अधिकारी, गांजे, ता. जावली
(कोट)
मुबलक प्रमाणात पिण्याचे पाणी उपलब्ध होत असलेल्या कास तलाव परिसरात वन्यजिवांचा अधिवास मोठ्या प्रमाणावर आहे. दरम्यान, तलाव परिसरात ठिकठिकाणी तलावाच्या काठी तसेच झाडाझुडपात होणारा प्लॅस्टिक, कागदांचा कचरा वन्यजिवांना धोका निर्माण करणारा असल्याने या परिसरात कचरा होणार नाही याची काळजी सर्वांनी घेणे आवश्यक आहे.
-प्रशांतकुमार पडवळ, वनपाल
फोटो आहे..
25कास
कास तलावावर प्लॅस्टिक कचरा मुक्या जनावरांना जीवघेणा ठरत असल्याचे चित्र दिसत आहे.