घंटागाडी सुरू न केल्यास कचरा रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:46 AM2021-03-01T04:46:53+5:302021-03-01T04:46:53+5:30
सातारा : गोरखपूर-पिरवाडी येथे सुरू करण्यात आलेली घंडागाडी कोणतीही पूर्वकल्पना न देता बंद करण्यात आली आहे. त्यामुळे या भागातील ...
सातारा : गोरखपूर-पिरवाडी येथे सुरू करण्यात आलेली घंडागाडी कोणतीही पूर्वकल्पना न देता बंद करण्यात आली आहे. त्यामुळे या भागातील कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनू लागला आहे. येथील घंटागाडी सेवा तातडीने सुरू करण्यात यावी, अन्यथा विसावा नाका येथील मुख्य चौकात कचरा टाकण्यात येईल, असा इशारा पिरवाडी ग्रामस्थांनी दिला आहे.
याबाबत जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, मुख्याधिकारी, उपनगराध्यक्ष यांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की, गोरखपूर पिरवाडी हा भाग पूर्वी खेड ग्रामपंचायतीच्या अधिकारात होता; परंतु नवीन नगररचनेनुसार हा भाग सातारा नगरपालिकेच्या हद्दीत गेला आहे. पालिकेकडून या ठिकाणी कचरा संकलनासाठी घंटागाडी सुरू करण्यात आली. मात्र, गेल्या पंचवीस दिवसांपासून घंटागाडी बंद असल्याने कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
रस्त्याकडेला कचऱ्याचे ढीग साचू लागल्याने याचा सर्वांनाच नाहक त्रास सहन करावा लागत आहे. संबंधित घंटागाडी ठेकेदाराशी संपर्क साधला असता त्याचे बिल अदा केले नसल्याचे सांगितले जात आहे. ग्रामपंचायत व नगरपालिकेच्या टोलवाटोलवीत नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न मात्र बिकट होऊ लागला आहे.
पालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी १५ एप्रिलपूर्वी घंटागाडी सुरू होऊ शकत नसल्याचे सांगितले. कोणतीही पूर्वकल्पना न देता बंद करण्यात आलेली घंटागाडी तातडीने सुरू करावी, अन्यथा सर्व रहिवासी कचरा घेऊन विसावा नाका येथील चौकात आणून टाकतील, याला सर्वस्वी पालिका प्रशासन जबाबदार असेल, असा इशारा गोरखपूर-पिरवाडी ग्रामस्थांनी दिला आहे.