विद्यार्थ्यांमध्ये गरुड भरारीची क्षमता : वीरकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:38 AM2021-07-31T04:38:24+5:302021-07-31T04:38:24+5:30
म्हसवड : ‘क्रांतिवीर शैक्षणिक संकुल एक उपक्रमशील संकुल आहे. या संकुलातील विद्यार्थ्यांमध्ये गरुड भरारी घेण्याची क्षमता आहे,’ ...
म्हसवड : ‘क्रांतिवीर शैक्षणिक संकुल एक उपक्रमशील संकुल आहे. या संकुलातील विद्यार्थ्यांमध्ये गरुड भरारी घेण्याची क्षमता आहे,’ असे प्रतिपादन सनदी अधिकारी विक्रम वीरकर यांनी केले.
कृषी विकास प्रतिष्ठान संचलित आत्मगिरी माध्यमिक विद्यालयातील दहावीच्या परीक्षेत गुणवंत ठरलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार विक्रम वीरकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी संस्थापक प्रा. विश्वंभर बाबर, सचिव सुलोचना बाबर, मुख्याध्यापक अनिल माने, प्राचार्य विठ्ठल लवटे, डी. बी. जावीर, संग्राम वीरकर उपस्थित होते.
वीरकर म्हणाले, ‘माण ही सोन्याची खाण असून येथील विद्यार्थी कष्टाळू आहे. त्यांना योग्य मार्गदर्शन केल्यास ध्येय साध्य करणे सहजसोपे आहे. जीवनात कष्ट करण्याची तयारी ठेवा. जिद्द व चिकाटी कायम ठेवा. यश तुमच्या पायाशी लोळण घेतल्याशिवाय राहणार नाही. परिस्थितीशी संघर्ष करून ध्येय निश्चितीसाठी प्रयत्नशील राहा. भविष्यातील सुख पाहण्यासाठी वर्तमानकाळातील संघर्ष व कष्ट महत्त्वाचे असते. अभ्यास नियमितपणे करून सातत्य ठेवा. उच्च विचारसरणीची जोपासना करा. आईवडील व गुरुजन यांचा नेहमी आदर करा. मन, मनगट आणि मेंदू यांच्या समन्वयातून आपले उद्दिष्ट साध्य करा.’
क्रांतिवीर शैक्षणिक संकुलातील शैक्षणिक उपक्रमांची माहिती प्रा. विश्वंभर बाबर यांनी दिली. अनिल माने यांनी प्रास्तविक केले. यावेळी गुणवंत विद्यार्थी वैष्णवी मासाळ, सुहाना मुलानी, पायल कापसे, साक्षी शेटे, श्रद्धा रसाळ, प्रज्ञा बनगर, वैष्णवी साळुंखे, साहिल लवटे, ओम टाकणे, अक्षदा खांडेकर यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.