क-हाडमधील भरवस्तीत गॅसचा स्फोट; परिसर हादरला : लाखो रुपयांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2019 06:45 PM2019-10-17T18:45:48+5:302019-10-17T18:48:15+5:30
शहरातील गुरुवार पेठेत असलेल्या या ट्रस्टच्या इमारतीत फरसाणा दुकान आहे. गुरुवारी पहाटे त्या दुकानात सिलिंडरचा स्फोट झाला. त्यानंतर भीषण आग लागली.
क-हाड : येथील भरवस्तीतील दर्गाह मोहल्ला परिसरात गुरुवारी पहाटे गॅसचा स्फोट झाला. या स्फोटाने आसपासचा परिसर हादरला. स्फोटानंतर लागलेल्या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले. पीर मूर्तजा हजरत अली दर्गाह ट्रस्टच्या इमारतीत फरसाणच्या दुकानात ही दुर्घटना घडली.
शहरातील गुरुवार पेठेत असलेल्या या ट्रस्टच्या इमारतीत फरसाणा दुकान आहे. गुरुवारी पहाटे त्या दुकानात सिलिंडरचा स्फोट झाला. त्यानंतर भीषण आग लागली. आगीत त्या ट्रस्टसह फरसाण दुकानाच्या साहित्याचे सुमारे तीस लाखांच्या आसपास नुकसान झाले आहे. हजरत अली ट्रस्टच्यावतीने पीर बसवले जातात. त्याच्या साहित्याचे सुमारे वीस लाखांचे नुकसान झाले आहे. दर्गाह मोहल्ला येथे ट्रस्टची इमारत आहे. ती इमारत दिवाळीचे साहित्य तयार करण्यासाठी जैन फरसाण यांना दिली होती. बुधवारीही तेथे काम सुरू होते. रात्री उशिरा काम संपवून लोक गेली.
मात्र पहाटे चारच्या सुमारास आत असलेल्या गॅसचा जबरदस्त स्फोट झाला. त्यात जैन फरसाणचे दहा तर ट्रस्टच्या इमारतीसह पिराच्या साहित्याचे वीस लाखांचे नुकसान झाले. जोराचा आवाज झाल्याने शहरातील नागरिक धावत तेथे पोहोचले. पहाटेपासून मदतकार्य राबविले गेले. अग्निशमन दलाच्या जवानांच्या मदतीने स्थानिक नागरिकांनी मदतकार्य राबविले. तब्बल दोन तासांनी आग आटोक्यात आली. मात्र तोपर्यत आगीने सुमारे तीस लाखांचे नुकसान केले होते.