कऱ्हाड तालुक्यात दोन ठिकाणी गॅसचा भडका

By admin | Published: October 9, 2016 11:57 PM2016-10-09T23:57:51+5:302016-10-09T23:57:51+5:30

आठ गंभीर जखमी : कोपर्डेत सासू, सुनेसह चौघे, तर बनवडीत दाम्पत्यासह दोन मुले भाजली

Gas leakage in two places in Karhad taluka | कऱ्हाड तालुक्यात दोन ठिकाणी गॅसचा भडका

कऱ्हाड तालुक्यात दोन ठिकाणी गॅसचा भडका

Next

कोपर्डे हवेली : कऱ्हाड तालुक्यातील कोपर्डे हवेली व बनवडी येथे शनिवारी रात्री काही अंतराच्या फरकाने गॅसचा भडका उडाला. या दोन्ही वेगवेगळ्या घटनांत दोन कुटुंबांतील आठ गंभीर, तर एकजण वाचविताना जखमी झाला. या जखमींवर कऱ्हाड तसेच सांगलीच्या खासगी रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.
कोपर्डे हवेली येथे संजय गुंगा भोसले हे कुटुंबासह वास्तव्यास आहेत. शनिवारी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास भोसले कुटुंबातील समाबाई भोसले या गॅसवर स्वयंपाक करीत होत्या. त्यांची सून मंगल याही त्यांना मदत करीत होत्या. कुटुंबातील संदेश व ऋतुराज ही दोन मुले स्वयंपाकघरात खेळत होती. स्वयंपाक सुरू असतानाच अचानक गॅसचा प्रवाह वाढला. हा गॅस स्वयंपाकघरात सर्वत्र पसरला. तसेच अचानक भडका उडाला. त्यामुळे समाबाई, मंगल, ऋतुराज व संदेश हे चौघे जखमी झाले. घटनेनंतर काही सेकंदच घरात आगीच्या ज्वाळा पसरल्या. घटना निदर्शनास येताच परिसरातील ग्रामस्थांनी त्याठिकाणी धाव घेतली. जखमींना स्वयंपाकगृहातून बाहेर काढताना गणेश भोसले यांनाही आगीची झळ बसली. त्यामुळे तेही भाजले. ग्रामस्थांनी जखमींना उपचारार्थ कऱ्हाडच्या वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात हलविले. मात्र, त्याठिकाणी आवश्यक सोयी-सुविधा नसल्याने चौघांनाही पुढील उपचारासाठी सांगलीला हलविण्यात आले आहे. चौघांचीही प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
दरम्यान, बनवडी येथेही शनिवारी रात्री भेसके कुटुंबीयांच्या घरात गॅसचा भडका उडाला. त्यामध्ये भेसके पती, पत्नीसह त्यांची दोन मुले जखमी झाली. बनवडी येथे रस्त्यालगत असलेल्या प्रसाद रेसिडेन्सी इमारतीच्या ‘एस तेरा’ या फ्लॅटमध्ये प्रा. उमाकांत भेसके हे पत्नी व दोन मुलांसमवेत राहतात. शनिवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास जेवण आटोपल्यानंतर भेसके कुटुंबीय झोपी गेले. त्यानंतर रात्री साडेअकरा ते बारा वाजण्याच्या दरम्यान बाथरूममधील गॅसगिझरला गळती लागली. दारे व खिडक्या बंद असल्याने गॅस घरभर पसरला. हा गॅस देवघरातील निरांजनापर्यंत पोहोचल्यानंतर मोठा भडका उडाला. त्यामध्ये उमाकांत यांच्यासह त्यांची पत्नी व दोन मुले जखमी झाली. आरडाओरडा झाल्याने परिसरातील नागरिकांनी त्याठिकाणी धाव घेऊन जखमींना उपचारार्थ कऱ्हाड येथील रुग्णालयात हलविले.चौघांनाही साताऱ्याच्या शासकीय रुग्णालयात हलविले आहे.
 

Web Title: Gas leakage in two places in Karhad taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.