गॅस दरवाढीने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 05:13 AM2021-03-04T05:13:08+5:302021-03-04T05:13:08+5:30

कुडाळ : महागाईने उच्चांक गाठला आहे. यातच दिवाळीपासून स्वयंपाकाच्या गॅस दरवाढीने महागाईच्या भडक्यात आणखीच भर घातली. गेल्या चार महिन्यांत ...

The gas price hike has crippled the public budget | गॅस दरवाढीने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले

गॅस दरवाढीने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले

Next

कुडाळ : महागाईने उच्चांक गाठला आहे. यातच दिवाळीपासून स्वयंपाकाच्या गॅस दरवाढीने महागाईच्या भडक्यात आणखीच भर घातली. गेल्या चार महिन्यांत गॅसच्या दरात तब्बल दोनशे रुपयांची वाढ झाली. किराण्याबरोबरच भाजीपाल्याचेही दर भडकले आहेत. यामुळे सर्वसामान्य गृहिणींचे आर्थिक बजेट पुरते कोलमडले आहे.

कोरोनाच्या काळात या वर्षी अनेकांना आपला रोजगार गमवावा लागला. मिळेल तो रोजगार करून सर्वसामान्य आपला उदरनिर्वाह करू लागला. अशातच जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीही गगनाला भिडल्या. टप्प्याटप्प्याने अनलॉक झाल्यानंतर विस्कटलेली व्यवसायाची घडी हळूहळू रुळावर यायला लागली. यामुळे महागाई कमी होईल, अशी आशा होती.

मात्र, गेल्या काही दिवसांपासून गॅस दरवाढीने कमालीची पातळी गाठल्याने गृहिणींचे बजेट पुरते कोलमडले आहे. ग्रामीण भागात शासनाच्या वतीने उज्ज्वला योजनेतून अनेक लाभार्थींना गॅस कनेक्शन दिले आहे. यामुळे सर्वसामान्यांच्या घरातही स्वयंपाकासाठी गॅस पेटत होता. महिलांचा धुरापासून बचाव व्हावा, वृक्षतोड थांबावी यासाठी सवलतीच्या दरात गॅस कनेक्शन वाटप करण्यात आले. मात्र गेल्या काही दिवसांपासून गॅसच्या किमती वाढत असून सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. एका सिलिंडरसाठी आठशे रुपये मोजावे लागत आहेत. यामुळे सर्वसामान्यांना गॅस खरेदी करणे परवडत नसल्याने त्यांनी पुन्हा एकदा आपला मोर्चा चुलीकडे वळवला आहे. आता गॅसची शेगडी गुंडाळून ठेवत स्वयंपाकासाठी ग्रामीण भागात पुन्हा एकदा चुली पेटू लागल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

चौकट :

दोन महिन्यांत दोनशेने वाढ

१ डिसेंबरपासून दर आठवड्याला स्वयंपाकाच्या गॅसदरात वाढ झालेली आहे. डिसेंबर महिन्यात ५९४ रुपयांना मिळणारा गॅस ८०० रुपयांवर पोहोचला आहे. दोन महिन्यांच्या कालावधीत गॅस दरात तब्बल दोनशे रुपये इतकी प्रचंड वाढ झालेली आहे. यामुळे सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट पुरते कोलमडले आहे. कोरोनाच्या काळात वाढत्या महागाईच्या झळा ग्रामीण भागातील सामान्य जनतेला अधिक प्रमाणात पोहोचत आहेत.

कोट :

गॅसच्या वाढलेल्या किमतीमुळे गॅस खरेदी करू शकत नाही. वाढत्या महागाईमुळे आमचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. गेले कित्येक दिवस बंद केलेल्या चुली आता पुन्हा पेटवण्याची वेळ आली आहे. याकरिता सर्वसामान्यांचा विचार करून शासनाने घरगुती गॅसच्या किमती आवाक्यात ठेवाव्यात.

- रेश्मा पवार, गृहिणी, कुडाळ

Web Title: The gas price hike has crippled the public budget

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.