मारूल तर्फ पाटणमध्ये गेस्ट्रोमुळे हाहाकार, बालिकेचा बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 07:51 PM2021-03-23T19:51:12+5:302021-03-23T19:54:31+5:30
Health Satara karad- कोयना विभागातील मारूल तर्फ पाटण येथे नळाद्वारे दुषित पाणी पुरवठा झाल्यामुळे गॅस्ट्रोची साथ पसरली आहे. यामध्ये पाच वर्षाच्या बालिकेचा दुर्दैवी अंत झाल्याने संताप व्यक्त होत आहे. गावातील सुमारे ८५ जणांना उलट्या व जुलाबाचा त्रास जाणवू लागला असून त्यांच्यावर घरामध्ये आणि उपकेंद्रात उपचार सुरू आहेत.
पाटण : कोयना विभागातील मारूल तर्फ पाटण येथे नळाद्वारे दुषित पाणी पुरवठा झाल्यामुळे गॅस्ट्रोची साथ पसरली आहे. यामध्ये पाच वर्षाच्या बालिकेचा दुर्दैवी अंत झाल्याने संताप व्यक्त होत आहे. गावातील सुमारे ८५ जणांना उलट्या व जुलाबाचा त्रास जाणवू लागला असून त्यांच्यावर घरामध्ये आणि उपकेंद्रात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, आरोग्य विभागाचे पथक गावात दोन दिवसांपासून ठिय्या मांडून आहे. सर्व परिस्थितीवर आरोग्य विभागाचे लक्ष आहे. गटविकास अधिकारी मीना साळुंखे, आरोग्य अधिकारी बी. आर. पाटील यांच्यासह पंचायत समिती सदस्य बबनराव कांबळे यांनी गावाला भेट देवून अधिकाऱ्यांना सूचना केल्या.
पाटण तालुक्यातील मारूल तर्फ पाटण येथे गत दोन दिवसांपासून ग्रामस्थांना उलट्या व जुलाबाचा त्रास होवू लागला. याबाबतची महिती ग्रामस्थांनी पंचायत समिती सदस्य बबनराव कांबळे यांना दिल्यानंतर त्यांनी तात्काळ गावाला भेट देवून पाहणी केल्यावर दुषित पाण्यामुळे गावात गॅस्ट्रोची साथ पसरल्याचे त्यांच्या लक्षात आले.
बबनराव कांबळे यांनी तातडीने गटविकास अधिकारी मीना साळुंखे यांच्याशी संपर्क साधून आरोग्य विभागाला याची कल्पना दिली. त्यानंतर आरोग्य विभागाचे पथक गावात दाखल झाले. उपकेंद्रात ग्रामस्थांची आरोग्य तपासणी करण्यात आली. काही रुग्णांना उपकेंद्रात आणि घरामध्ये उपचार सुरू करण्यात आले आहेत.
दरम्यान, शनिवारी शेळके वस्तीजवळील सुतार वस्तीमधील जान्हवी लोहार या पाच वर्षाच्या बालिकेला उलट्या व जुलाबाचा त्रास होवू लागल्याने तिला पाटण येथील खाजगी दवाखान्यात आणण्यात आले होते. येथील डॉक्टरांनी तिला कऱ्हाडात पुढील उपचारार्थ नेण्यास सांगितले होते. मात्र कुटुंबियांनी तिला परत गावाला नेले. त्यानंतर रविवारी सकाळी पुन्हा जान्हवीला उलट्या व जुलाबाचा त्रास होवू लागल्याने तिला कऱ्हाडला नेत असताना वाटेतच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.
गटविकास अधिकारी मीना साळुंखे व तालुका वैद्यकीय अधिकारी आर. बी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हेळवाक प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी सुप्रिम कांबळे, प्रफुल्लकांत कांबळे, आरोग्य सहाय्यक जी. एस. धुमाळ, आरोग्य सेवक सुभाष धामोडे, ताहीर डांगे, अनिरूध्द कोरडे, आरोग्य सेविका पार्वती माने, प्रतिक्षा पेंढारी, मुसा चाफेरकर, आरोग्य विस्तार अधिकारी टी. बी. पाटील हे पथक गावात तळ ठोकून आहे.
पाईपलाईनला गळती लागल्याचे स्पष्ट
मारूल तर्फ पाटण गावात घरोघरी जावून अंगणवाडी सेविका व आशांमार्फत सर्वे करण्याचे काम सुरू आहे. गावात साथ का उद्भवली याची शहानिशा करण्यासाठी पाटण येथील पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी उपअभियंता एस. आर. कदम व शाखा अभियंता एम. बी. पाटील यांनी पिण्याच्या पाण्याच्या योजनेची तपासणी केली. यात पाईपलाईनला काही ठिकाणी गळती लागल्याचे निदर्शनास आले आहे.