फाटक बंद..आंदोलन सुरू!
By admin | Published: March 29, 2015 11:16 PM2015-03-29T23:16:03+5:302015-03-30T00:10:42+5:30
कोणेगावच्या ग्रामस्थांमध्ये संताप : पस्तीस वर्षांपासूनची परंपरा होणार कालबाह्य
मसूर : कोणेगाव, ता. कऱ्हाड या गावाला मसूरहून कांबिरवाडीमार्गे जात असताना कांबिरवाडी व कोणेगाव दरम्यान असणारे रेल्वे गेट सोमवार, दि. ३० पासून कायमचे बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे कोणेगाव ग्रामस्थांनी सोमवारी सकाळी अकरा वाजता रेल रोको आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे. या परिसरातील वाड्या-वस्त्या तसेच कोणेगावातील सुमारे तीन हजार लोकसंख्या असलेल्या या गावाला याशिवाय पर्यायी रस्ता नसल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत.
गेल्या पस्तीस वर्षांपासून याठिकाणी रेल्वे फाटक आहे. या फाटकामधून ग्रामस्थ नेहमी ये-जा करतात. मात्र, रेल्वे प्रशासनाने अचानक हे फाटक बंद करण्याचा निर्णय घेतल्याने ग्रामस्थांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. कोणेगावला तिन्ही बाजूंनी कृष्णा नदी असून, गावाला मुख्य बाजारपेठ असलेल्या मसूर यागावी जाण्यासाठी या गेटचा उपयोग होत आहे.
या गेटऐवजी पर्यायी रस्ता हा कच्चा असून, तो अरुंद आहे. पावसाळ्यात समोरून वाहन आले तर लोकांना रेल्वेकडेला जावे लागणार आहे. आणि त्यामुळे भविष्यात मोठा अपघात होण्याची शक्यता आहे.
हा रस्ता काळ्या मातीतून गेला आहे. गेल्या ३५ वर्षांपासून हे फाटक सुरू झाल्यापासून आजपर्यंत ते सायंकाळी सात वाजल्यापासून सकाळी सात वाजेपर्यंत बंद अवस्थेत होते तरीही ग्रामस्थांनी कोणतीही तक्रार न करता त्या मार्गावरून ये -जा केली. परंतु आता फाटकच बंद होत आहे.
रेल्वे प्रशासनाने फाटकाशेजारी रेल्वे गेट सोमवारपासून बंद करण्यात येत असल्याचा फलक लावला आहे. हा फलक वाचून ग्रामस्थांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे. ग्रामस्थांना कसलीही पूर्व सूचना न देता रेल्वे प्रशासनाने ही आडमुठी भूमिका घेतल्याने ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. रविवारी रेल्वे फाटकावर काही नागरिकांना अचानक फलक दिसला. सोमवारपासून हे फाटक बंद होणार असल्याने गावात याची माहिती वाऱ्यासारखी पसरली. काहींनी तातडीने बैठक घेऊन यावर आंदोलनाची तयारी करण्यासाठी निर्णय घेतला. (वार्ताहर)
गत पस्तीस वर्षापासून वापरात असणारे गेट रेल्वे प्रशासनाने अचानक बंद करण्याचा घेतलेला निर्णय गावाला विचारात घेवून घ्यायला हवा होता. उंब्रज - मसूर रस्त्यावर असणा-या गेटच्या ठिकाणी उड्डाण पूल होणार आहे. असे समजते परंतु जोपर्यंत उड्डाण पूल होत नाही तोपर्यंत तरी आमचे गेट चालू रहावे.
राजकुमार चव्हाण
माजी उपसरपंच कोणेगांव
आमची कुचंबणा करु नका
कांबिरवाडी-कोणेगावदरम्यान असलेले रेल्वेच्या फाटकाचा गेल्या तीस ते पस्तीस वर्षांपासून येथील नागरिक रहदारीसाठी वापर करत आहेत, असे असताना हे फटक बंद करण्याचा निर्णय घेतला. सध्या पर्यायी रस्ता या ठिकाणी नाही. पलीकडे कसे जायचे, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.