कोयना धरणाचे दरवाजे दीड फुटावर, विसर्ग कमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2021 01:58 PM2021-08-02T13:58:50+5:302021-08-02T14:00:18+5:30
Koyana Dam Satara : सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस सुरूच असून महाबळेश्वर येथे सर्वाधिक ४३ मिलीमीटरची नोंद झाली. तर पाण्याची आवक कमी होत असल्याने कोयनेचे दरवाजे साडे दहा फुटांवरुन दीड फुटापर्यंत खाली घेण्यात आले. त्यामुळे विसर्ग कमी झाला आहे.
सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस सुरूच असून महाबळेश्वर येथे सर्वाधिक ४३ मिलीमीटरची नोंद झाली. तर पाण्याची आवक कमी होत असल्याने कोयनेचे दरवाजे साडे दहा फुटांवरुन दीड फुटापर्यंत खाली घेण्यात आले. त्यामुळे विसर्ग कमी झाला आहे.
जिल्ह्यात १२ दिवसांपूर्वी धुवाँधार पाऊस पडला होता. कास, बामणोली, तापोळा, नवजा, कोयना आणि महाबळेश्वर भागात धो-धो पावसामुळे ओढे, नाले भरुन वाहत होते. नद्यांना पूर आला होता. तसेच पश्चिम भागातील प्रमुख धरणांत मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली.
यामुळे सर्वच धरणांतून विसर्ग सुरू करावा लागला. मात्र, गेल्या आठवड्यापासून पावसाचा जोर कमी झाला आहे. कोयनेसह नवजा, महाबळेश्वर येथेही जेमतेमच पाऊस होत आहे. यामुळे धरणांत येणाऱ्या पाण्याची आवक मंदावली आहे.
सोमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनेला २० मिलीमीटर पाऊस झाला. तर जूनपासून आतापर्यंत ३१४७ मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. नवजा येथे ११ आणि यावर्षी आतापर्यंत ३९९० मिलीमीटर पाऊस झाला. तर महाबळेश्वरला ४३ मिलीमीटर पाऊस पडला. जूनपासून महाबळेश्वरला ४१२७ मिलीमीटर पर्जन्यमान झाले आहे.
दरम्यान, सोमवारी सकाळच्या सुमारास कोयना धरणात २४६६४ क्यूसेक वेगाने पाणी येत होते. तर ९ च्या सुमारास धरणाचे सहा दरवाजे साडे दहा फुटांवरुन कमी करण्यात आले. त्यामुळे दीड फुट उचलून त्यातून ७७९५ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. तर पायथा वीजगृह २१०० असा मिळून ९८९५ क्यूसेक पाण्याचा विसर्ग कोयना धरणातून सुरू होता. तर धरणात ८४.७७ टीएमसी पाणीसाठा झालेला. गेल्या काही दिवसांत धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात आल्याने पाणीसाठा कमी झाला आहे.
सोमवारी सकाळचा पाणीसाठा
सोमवारी सकाळी धोम धरणांत ७६.९९ टक्के पाणीसाठा झाला होता. तर ५३४ क्यूसेकने पाणी विसर्ग करण्यात येत होता. कण्हेरमधून ५७४ क्यूसेक विसर्ग तर धरणांत ७.७४ टीएमसी साठा झालेला. उरमोडी धरण क्षेत्रात सकाळपर्यंत ९ मिलीमीटर पाऊस पडला. तर ७.४९ टीएमसी साठा झाला होता. उरमोडीतून ४५० क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत होता.