सातारा शहराच्या प्रवेशद्वारांना मराठा सरदारांची नावे द्यावीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 05:47 AM2021-02-20T05:47:51+5:302021-02-20T05:47:51+5:30
सातारा : सातारा शहराला तीनशे वर्षांचा ऐतिहासिक वारसा आहे. या नगरीच्या प्रवेशद्वारांना शिवकाळातील प्रसिद्ध मराठा सरदारांची नावे देण्यात यावीत, ...
सातारा : सातारा शहराला तीनशे वर्षांचा ऐतिहासिक वारसा आहे. या नगरीच्या प्रवेशद्वारांना शिवकाळातील प्रसिद्ध मराठा सरदारांची नावे देण्यात यावीत, अशी मागणी युवाशक्ती फाऊंडेशनचे अध्यक्ष संग्राम बर्गे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
संग्राम बर्गे यांनी गुरुवारी सकाळी पालिकेत येऊन नगराध्यक्ष माधवी कदम, उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांना आपल्या मागणीचे निवेदन दिले. या निवेदनात म्हटले आहे की, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पुनित झालेल्या ऐतिहासिक शाहू नगरीला तीनशे वर्षांची परंपरा आहे. हिंदवी स्वराज्याच्या उभारणीत नरवीर तानाजी मालुसरे, मुरारबाजी, बाजीप्रभू देशपांडे, सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्यासारख्या अनेक मराठा सरदारांनी योगदान दिले. त्यांच्या कर्तृत्वाचा इतिहास आजच्या पिढीला माहीत व्हावा, यासाठी मोळाचा ओढा, वाढे फाटा, कोल्हापूर फाटा, बोगदा, अजंठा चौक आदी ठिकाणी स्वागत कमानी उभारून त्याला मराठा सरदारांची नावे देण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, खासदार उदयनराजे भोसले यांच्या सूचनेनुसार अशा स्वागत कमानींचा प्रस्ताव तयार करण्यात आल्याची माहिती उपनगराध्यक्षांनी दिली. यावेळी गणेश जाधव, धनंजय पाटील, अभिजीत बारटक्के, बापू ओतारी आदी उपस्थित होते.