गुन्हेगारांच्या हल्ल्यात तीन पोलीस जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 02:58 AM2017-07-31T02:58:42+5:302017-07-31T02:58:42+5:30

अट्टल गुन्हेगार संज्या पवार याला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरच प्रतिहल्ला करण्यात आला. यामध्ये तीन पोलीस जखमी झाले आहेत.

gaunahaegaaraancayaa-halalayaata-taina-paolaisa-jakhamai | गुन्हेगारांच्या हल्ल्यात तीन पोलीस जखमी

गुन्हेगारांच्या हल्ल्यात तीन पोलीस जखमी

Next

लोणंद (जि.सातारा) : अट्टल गुन्हेगार संज्या पवार याला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरच प्रतिहल्ला करण्यात आला. यामध्ये तीन पोलीस जखमी झाले आहेत. पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात संज्या पवारच्या मांडीत गोळी घुसली. परंतु, अशा अवस्थेतही त्याच्या साथीदारांनी त्याला घेऊन दुचाकीवरुन पलायन केले. हे थरारनाट्य झणझणे सासवड येथे रविवारी सकाळी घडले.
जखमींमध्ये महेश जगदाळे, विठ्ठल बबन काळे व आणखी एका पोलिसाचा समावेश असून हे तिघेही फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत.
रविवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास संज्या नमन्या पवार (वय ४०, रा. सासवड, झणझणे) हा १३ गुन्ह्यांमध्ये फरारी असलेला आरोपी वाठार स्टेशनकडून येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार माळी बेदवस्ती, वडाचा मळा येथे एका घरासमोर पोलिस दबा धरून बसले. आरोपी संज्या पवार हा तेथे आल्याचे दिसताच पोलिसांनी झडप घातली. संशयित संज्याबरोबर तीन महिलांसह सहा जण होते. हे सर्व जण दुचाकीवर होते. पोलिसांनी संज्यावर झडप घालताच या जमावाने पोलिसांवरच दांडके, कोयता, तलवार, खुरपे, दगडे घेऊन हल्ला केला. एवढेच नव्हे तर कॉन्स्टेबल महेश जगदाळे यांच्या पाठीत तलवारीने वार केला. तर पोलिस कर्मचारी काळे हेही जखमी झाले. संशयितांकडून जोरदार हल्ला होत असल्याचे पाहून स्वसंरक्षणासाठी पोलिस उपनिरीक्षक राहुलकुमार भोळे यांनी आरोपी संज्या पवार याच्या दिशेने गोळीबार केला. एक गोळी संज्या पवारच्या डाव्या मांडीत घुसली. त्या अवस्थेतही दुचाकीवरून घेऊन सर्वजण फरार झाले. जखमी पोलिसांवर फलटण येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Web Title: gaunahaegaaraancayaa-halalayaata-taina-paolaisa-jakhamai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.