Kaas plateau: कास परिसरात गव्यांचा वावर, पर्यटकांना होतयं वारंवार दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2022 03:52 PM2022-07-04T15:52:54+5:302022-07-04T16:34:49+5:30

पर्यटकांनी वाहनातूनच रानगव्याची छबी कॅमेऱ्यात टिपली

gaur in the Kas area, An atmosphere of fear among tourists | Kaas plateau: कास परिसरात गव्यांचा वावर, पर्यटकांना होतयं वारंवार दर्शन

Kaas plateau: कास परिसरात गव्यांचा वावर, पर्यटकांना होतयं वारंवार दर्शन

Next

पेट्री : जागतिक वारसास्थळ कास पठार परिसरात पर्यटकांना रानगव्यांच्या कळपाचे वारंवार दर्शन होत आहे. सोमवारी सकाळी चक्क या महाकाय रानगव्यांचे दर्शन बहुतांशी वाहनचालक दूरवर गाडी उभी करून घेताना दिसत होते. तसेच काही वाहनचालकांनी चारचाकीतूनच या रानगव्याची छबी कॅमेऱ्यात टिपली. परंतु पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण दिसून येत होते.

शहराच्या पश्चिमेला २५ किलोमीटर अंतरावरील कास पठार जिल्ह्यातील प्रमुख पर्यटनस्थळ म्हणून ओळखले जाते. नेहमीच जिल्ह्यातील, परजिल्ह्यातील बहुसंख्य पर्यटकांच्या गर्दीने कास पठार परिसर बहरलेले दिसते. त्यात कधीही पाहण्यास न मिळालेले दुर्मिळ रानगवे कास पठार परिसरात पाहायला मिळाल्याने पर्यटकांना पर्वणीच ठरत आहे.

बैल कुळातील गवा सर्वात मोठा प्राणी असून, कास परिसरातील दाट, घनदाट जंगलात त्याचे कळपाने वारंवार दर्शन घडल्याचे स्थानिकांमधून बोलले जाते. यापूर्वी बहुतांशी वेळा पारंबे फाटा ते एकीव या मार्गावरून प्रवास करताना वाहनचालक उत्सुकतेपोटी या गव्यांची छायाचित्रे काढतात खरं! परंतु कोणत्याही क्षणी गव्याचा हल्ला होऊ शकतो, या हेतूने अगोदरच वाहने वळवून लावण्याची त्यांची धडपड असते.

कास पठार मोठ्या प्रमाणावर जैवविविधता असलेले ठिकाण आहे. येथील निसर्गसौंदर्य, चोहोंबाजूला हिरवीगार दाट झाडी, निसर्गाचे वरदान असलेल्या कास या पर्यटनस्थळी रानगव्यांचे वारंवार झुंड दिसत असल्याने काहींना याची पर्वणी तर काहींची भंबेरी उडताना दिसत आहे. कासच्या दाट जंगलात गव्यांचा वावर आहे. पाणवठ्याच्या ठिकाणी गव्यांचा कळप बहुतांशी वेळा पाहावयास मिळतो. गेल्या एक-दोन महिन्यांत कास पठार परिसरात महाकाय रानगव्यांचे अनेकांनी वारंवार दर्शन घेतले.

वन्यपशुंपासून सावध राहा...

अचानक रानगवे समोर आले तर त्यांची कोणतीही चेष्टा करू नये. दगड अथवा काहीही वस्तू फेकू नये. त्याला चिडविण्याचा देखील प्रयत्न करू नये. त्यांच्या मार्गात अडथळा उभा न करता ते तेथून शांतपणे निघून जातात; परंतु त्यांना त्रास दिला गेल्यास ते हल्ला करतात. रानगवा समोर दिसल्यास पर्यटकांनी तेथून दूर जावे. दरम्यान, पर्यटनप्रसंगी वन्यपशुंपासून सावध राहावे, असे स्थानिक ग्रामस्थांतून बोलले जाते.

Web Title: gaur in the Kas area, An atmosphere of fear among tourists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.