महाबळेश्वर-मेढा मुख्य रस्त्यावर जखमी अवस्थेत आढळला गवा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2023 06:45 PM2023-04-13T18:45:06+5:302023-04-13T18:49:52+5:30
अधिक उपचारांसाठी गव्यास वाहनातून चांदोली अभयारण्यात नेण्यात येणार
महाबळेश्वर: शहरापासून काहीच अंतरावर मेढा मुख्य रस्त्यावर माचूतर गणेश मंदिरानजीक आज, गुरुवारी गवा जखमी अवस्थेत आढळून आला. परिसरातील नागरिकांसह प्राणीमित्र रफिक नालबंद यांनी याबाबतची माहिती वनविभागास दिली. वनविभागाचे वनपाल सहदेव भिसे, वनरक्षक लहू राऊत, रोहित लोहार यांच्यासह सह्याद्री प्रोटेक्टर्सचे संदेश भिसे व सहकार्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
काहीवेळानंतर जंगलामध्ये हा गवा लंगडत गेला. जखमी गव्यास उपचारांची आवश्यकता असल्याने वनविभागाने पुणे येथील रेस्क्यू टीमला पाचारण केले. दुपारी ही टीम घटनास्थळी दाखल झाली. गव्याच्या हालचालींवर लक्ष ठेवून प्रथम त्याला बेशुद्ध करुन प्रथमोपचार करण्यात आले. अधिक उपचारांसाठी गव्यास वाहनातून चांदोली अभयारण्यात नेण्यात येणार असल्याची माहिती वनविभागाच्यावतीने देण्यात आली.
उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.वनसंरक्षक महेश झांझुर्णे, वनक्षेत्रपाल रंजनसिंह परदेशी यांच्या नेतृत्वाखाली या मदतकार्यात वनविभागाचे वनपाल सहदेव भिसे, वनरक्षक लहू राऊत, रोहित लोहार यांच्यासह सह्याद्री प्रोटेक्टर्सचे संदेश भिसे, देवेंद्र परदेशी, सचिन ढेबे, सचिन गुजर, साहिल सुतार, हर्ष साळुंखे, ओंकार पवार, प्रणित शिंदे, अशिष पवार, प्रथमेश पवार, प्रथमेश कोळी यांच्यासह वनविभागाचे कर्मचारी सहभागी झाले होते.