गौरी सणासाठी आता ‘मल्टी स्टँड’ची निर्मिती!
By admin | Published: September 13, 2015 09:16 PM2015-09-13T21:16:09+5:302015-09-13T22:17:33+5:30
बाजारपेठ गजबजली : सजावटीचे साहित्य खरेदीसाठी नागरिकांची गर्दी -- आले गणराया
शाहूपुरी : काही दिवसांवर गौरी, गणपती सण येऊन ठेपला आहे. सजावटीसाठी लागणाऱ्या साहित्यांनी बाजारपेठ सजली आहे. पंधरा फराळांचे पदार्थ ठेवता येतील असे स्टॅण्ड यंदा बाजारात विक्रीसाठी आले आहे. त्यामुळे गौरीपुढे पदार्थ कसे मांडावेत, हा प्रश्न सुटणार आहे. सातारा येथील म्हसवे गावामध्ये धनंजय बर्वे यांनी गौरी सणाच्या सजावटीसाठी स्टॅण्ड तयार केले आहेत. एकाचवेळी एका स्टॅण्डवर पंधरा फराळांचे पदार्थ ठेवता येतात. सजावटीसाठी आतापर्यंत महिला फळ्या व डब्यांचा वापर करत होत्या. फळ्या ठेवताना महिलांना अनेक प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागत होता. स्वस्तिक, कोयरी, ओम, त्रिकोण, फुलदाणी, दीपमाळ, झाड, कमळ अशा विविध प्रकारात स्टॅण्ड बनविण्यात आले आहेत. (वार्ताहर)
विद्युतरोषणाईचे विविधरंगी बल्ब
गणेशोत्सवानिमित्त बाजारपेठेत विविध प्रकारच्या सजावटीच्या वस्तू विक्रीसाठी आल्या आहेत. यामध्ये थर्माकोलपासून बनविलेले आकर्षक मखर, विद्युतरोषणाईचे विविधरंगी बल्ब, आभूषणे तसेच आरास बनविण्यासाठी रंगीत पडदे, फुलांच्या माळा अशा विविध वस्तूंनी बाजारपेठ सजली आहे. खरेदीसाठी रात्रीच्या वेळी बाजारपेठ फुलून जात आहे.
गौरी, गणपती सजावटीत फराळांची आकर्षक मांडणी करणे हे कौशल्याचे काम आहे. महिलांना मोठी डोकेदुखी सहन करावी लागते. यातून फराळांच्या सजावटीचे स्टॅण्ड बनविण्याची कल्पना सुचली. कमी वेळेत, जास्त पदार्थ एकाच स्टॅण्डवर मांडता येतील अशी वेगवेगळ्या आकारातील स्टॅण्ड बनविली आहेत. याला महिलांमधून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
- धनंजय बर्वे, कारागीर, म्हसवे