गवे पोहोचले साताऱ्याच्या वेशीवर!
By admin | Published: January 10, 2016 10:44 PM2016-01-10T22:44:26+5:302016-01-11T00:47:07+5:30
नव्या संघर्षाची नांदी : महादरे भागात प्रथमच दर्शन; पिकांची नासधूस; सारखळ भागातही धोका
राजीव मुळ्ये -- सातारा --बिबटे, तरस, रानडुक्कर, मोर आदी वन्यजीवांचे दर्शन सातारा परिसरात नवे नाही; मात्र आता चक्क टनभर वजनाचा गवा साताऱ्याच्या उंबरठ्याशी येऊन उभा ठाकला आहे. महादरे, भैरोबा डोंगर, सारखळ भागात पिकांचे नुकसान झाले असून, शहर तसेच सातारा-मेढा रस्ता गव्यापासून फारसा दूर राहिलेला नाही. डोंगरातल्या या महाकाय प्राण्याची ही वहिवाट बनण्यापूर्वीच ठोस उपाय न योजल्यास मानव-वन्यजीव संघर्ष उफाळण्याची भीती आहे.कास तलावाजवळील जंगल, कास-महाबळेश्वर रस्ता (राजमार्ग), यवतेश्वर-बामणोली मार्गावरील जंगले ही गव्यांची वसतिस्थाने आहेत. ही उंचावरची ठिकाणे सोडून गवे सपाटीला यापूर्वी कधी आले नव्हते. मात्र, गेल्या महिनाभरापासून महादरे ग्रामस्थांच्या पिकांचे नुकसान होऊ लागले. प्रथम रानडुकरांचा संशय होता; मात्र रात्रीच्या वेळी पाहणी केली असता चक्क तीन गवे दिसून आल्यावर महादरे ग्रामस्थांची छाती दडपली. आजतागायत गव्यांनी तिथेच मुक्काम ठोकला आहे. तिघांचे दर्शन झाले; मात्र एकूण किती गवे आहेत, हे उघड झालेले नाही.महादरेच्या शिवारालगत भैरोबा डोंगर आहे. त्या पलीकडे अंबेदरे, सारखळ ही गावे आहेत. सारखळमध्ये शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास एक गवा दिसून आला. काही शेतकरी त्याला हुसकावून लावण्यासाठी मागे लागले होते. हा गवा लंगडत होता, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. काही वेळाने सातारचे वनक्षेत्रपाल व्ही. आर. शिंदे आणि कर्मचारी पोलिसांना घेऊन त्या ठिकाणी पोहोचले आणि संघर्ष सुरू होण्यापूर्वी रोखला. पाणी विकत घेऊन दोन-दोन पाळ्या पिकांना दिल्यानंतर ते पीक गवे उद््ध्वस्त करीत आहेत, अशी ग्रामस्थांची तक्रार होती. महादरे गावातही शेतांचे नुकसान झाले आहे. प्रामुख्याने ज्वारीचे पीक गव्यांनी भुईसपाट केले आहे. वनविभागाने नुकसानीचे पंचनामेही केले आहेत. कमीत कमी चार गुंठे व जास्तीत जास्त वीस गुंठे पिकाचे नुकसान झाल्याचे वन विभागाकडून सांगण्यात आले. वनपाल सुनील भोसले, वनरक्षक दीपक गायकवाड, प्रशांत पडवळ, नीलेश रजपूत, मारुती माने आदी परिस्थितीवर नजर ठेवून आहेत. मात्र, गवा दिसताच पाठलाग न करता संपर्क साधावा, असे त्यांचे आवाहन आहे.
कसा टाळणार संघर्ष?
मानव-वन्यजीवातील नवा संघर्ष उंबरठ्याशी येऊन ठेपला असताना वन विभागाने गव्यांच्या मूळ अधिवासात पाणी आणि चाऱ्याची सोय करणे अत्यंत आवश्यक बनले आहे. कास, बामणोली परिसरात शेकडो हेक्टर वनजमीन आहे. त्यावर गवत लागवड करणे शक्यही आहे; मात्र त्यासाठी सध्या
पाणी उपलब्ध नसल्याचे सांगितले जाते. त्यामुळे आधी छोटे पाणवठे निर्माण करून परिसरात गवत लागवड करणे संयुक्तिक ठरणार आहे.
‘चिमट्या’जवळ ‘दे धक्का’
महादरे ते पेढ्याचा भैरोबा यादरम्यान एके ठिकाणी डोंगरात खोबण आहे. तिला ‘चिमटा’ असे म्हणतात. या ठिकाणी फिरायला गेलेल्या काही जणांना अचानक गवा समोर दिसल्याने त्यांना काय करावे हेच सुचेनासे झाले आणि त्यांना पळता भुई थोडी झाली होती.
आता शहर किती दूर...
महादरे येथील नुकसानग्रस्त शेते हत्ती तळ्याजवळची आहेत. तेथून समोर अजिंक्यतारा दिसतो. शहरापासून अवघ्या तीन किलोमीटरवर पोहोचलेले गवे शहरात शिरल्यास मोठा धोका संभवतो. तसेच सारखळ भागातील गवे रात्रीच्या वेळी सातारा-मेढा रस्त्यावर अचानक अवतरल्यास दुचाकी आणि चारचाकी वाहनेही अपघातग्रस्त होऊ शकतात. त्यामुळे हा परिसर गव्यांना ‘सवयीचा’ होण्यापूर्वीच त्यांच्या मूळ रहिवासाच्या ठिकाणची परिस्थिती सुधारणे गरजेचे बनले आहे.