सामान्य जनतेला हवे विकासाचे पक्षीय धोरण

By admin | Published: November 9, 2016 10:53 PM2016-11-09T22:53:20+5:302016-11-09T22:53:20+5:30

विकासाचा मुद्दा अजेंड्यावर : अनेक समस्या आवासून

General policy for development of common people | सामान्य जनतेला हवे विकासाचे पक्षीय धोरण

सामान्य जनतेला हवे विकासाचे पक्षीय धोरण

Next

विकासाचा मुद्दा अजेंड्यावर : अनेक समस्या आवासून; उदासिनतेचे धोरण विकासाच्या घोडदौडीतील मोठा अडसर
खंडाळा : खंडाळा शहरातील ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतीमध्ये झाले. वास्तविक प्रशासकीय पातळीवर हा बदल दिसत असला तरी शहराच्या विकासात्मक बाबींमध्ये परिवर्तन अपेक्षित आहे. सध्या या ठिकाणच्या काही बाबतीत विकासकामांना मूर्त स्वरूप मिळाले असले तरी अनेक समस्याही ‘आ’वासून उभ्या आहेत.
नगरपंचायत निवडणुकीच्या माध्यमातून या समस्यांच्या विळख्यातून शहराला बाहेर काढणारे पक्षीय धोरण सामान्य जनतेला अपेक्षित आहे.
खंडाळ्याची सत्ता गेली अनेक वर्षे काँग्रेसच्या ताब्यात आहे. पंचायत समितीचे सदस्य अनिरुद्ध गाढवे यांनी मूलभूत सुविधांचा विचार करून विकासात्मक कामे केली आहेत. शहराच्या मुख्य रस्त्यांचे डांबरीकरण, पाणीपुरवठा योजना, गावातील रस्त्यांच्या पथदिवे, गावठाणातील बंदिस्त गटार योजना, स्मशानभूमीचे सुशोभीकरण अशा विविध बाबतीत कामे झाली आहेत. मात्र, शहराचा आवाका पाहता केवळ एवढ्यावरच लोकांच्या गरजा भागू शकत नाहीत. ऋतुमानानुसार कित्येक समस्या पुढे येत राहिल्या आहेत. मात्र, केवळ चालढकलीचे राजकारण करीत विकासकामे प्रलंबितच राहिली आहेत.
त्यामुळे या निवडणुकीत अनेक समस्या राजकीय व्यासपीठावर डोके वर काढणार असल्याचे चित्र समोर आले आहे.
खंडाळा शहराचे मूळ गावठाण आणि त्याभोवती विस्तारलेला भाग याचा विचार करता नवीन वसाहती आणि गल्लींच्या रस्त्यांची कामे, बाहेरील रस्त्यांच्या कडेची उघड्यावरची गटारे, रस्त्यांची स्ट्रीट लाईट, मुख्य रस्त्यांचे अतिक्रमण हा तर कळीचा प्रश्न आहे.
याशिवाय शहराचे सांडपाणी निचरा व व्यवस्थापन, सार्वजनिक शौचालयांची दुरवस्था, मुताऱ्यांची वाणवा, मुख्य चौकांचे सुशोभीकरण, चिल्ड्रन पार्क, जलशुद्धीकरण प्रकल्प, ओढ्याची स्वच्छता, आठवडी बाजाराचे पुनर्वसन यासारख्या अनेक समस्या तशाच खितपत पडल्या आहेत. सामान्य माणसांच्या जीवनात ज्या गोष्टींची दैनंदिन व्यवहारात गरज भासते.
त्याबाबतीत उदासिनतेचे धोरण हे विकासाच्या घोडदौडीतील मोठा अडसर आहे. त्यामुळेच या निवडणुकीत पक्षीय पातळीवर उतरलेल्या पॅनेलकडून सामान्य जनतेला विकासाचे पक्षीय धोरण आवश्यक आहे.
वास्तविक, सर्वच निवडणुकीत सत्ताधारी पक्षांकडून विकासाचं तुणतुणं वाजविलं जातं. केलेल्या कामाचा प्रसार करण्याचं धोरण राबविलं जातं. मात्र ‘अजूनही काही बाकी आहे’ याची जाणीवही आवश्यक आहे.
खंडाळ्याच्या राजकारणाची परिस्थिती यापेक्षा वेगळी आहे, असे म्हणता येणार नाही; पण किमान गावचं गावपण टिकवणं आणि सामाजिक सलोखा राखणं याबाबतीत तरी सत्ताधाऱ्यांनी एक पाऊल पुढे ठेवले आहे. मात्र, शहराला आवश्यकता कशाची आहे आणि सत्ताधारी नेमके कुठे कमी पडले याचा लेखाजोखा जनतेसमोर मांडण्यासाठी विरोधकांना हीच योग्य वेळ असल्याने सर्वांनीच कंबर कसली आहे.
खंडाळा नगरपंचायतीत विकासकामे हा मुख्य मुद्दा सत्ताधारी आणि विरोधक यांच्या अजेंड्यावर राहणार हे निश्चित, त्यामुळे ही निवडणूक लक्षवेधी ठरणार असल्याने सगळ्यांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: General policy for development of common people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.