आमसभा जनतेच्या मनोरंजनाचा कार्यक्रम होऊ नये
By admin | Published: June 16, 2015 10:23 PM2015-06-16T22:23:40+5:302015-06-17T00:42:24+5:30
जयकुमार गोरे : जनतेचे प्रश्न तत्काळ मार्गी लावण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना
म्हसवड : माण तालुक्यातील जनतेच्या विविध प्रश्नांची सोडवणूकीसाठी आमसभेचे आयोजन करण्यात आले असून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी जनतेच्या प्रश्नांची गांभिर्याने दखल घेऊन जनतेची खोळंबलेली कामे मार्गी लावावीत नाहीतर आमसभा जनतेच्या मनोरंजनाचा कार्यक्रम होऊ नये यासाठी अधिकाऱ्यांनी आमसभेत मांडलेले प्रश्न तातडीने मार्गी लावावेत व या आमसभेस अनुपस्थित राहिलेल्या अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस संबंधितांनी काढावेत असा आदेश यावेळी आमदार जयकुमार गोरे यांनी दिला.दहिवडी, ता. माण येथील पंचायत समितीच्या आवारात आमसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार जयकुमार गोरे बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे कृषिसभापती शिवाजीराव शिंदे प्रांताधिकारी मिन्नाज मुल्ला, तहसिलदार सुरेखा माने, सभापती अक्काताई मासाळ, उपसभापती अतुल जाधव, गटविकास अधिकारी सिमा जगताप, माजी सभापती श्रीराम पाटील, जि. प. सदस्य सुभाष नरळे, स्मिता वायदंडे भगवानराव गोरे, एम. के. भोसले, धनाजी जाधव, शिला पोळ, दादासाहेब काळे, नगराध्यक्ष सुरेश म्हेत्रे, उपनगराध्यक्ष डॉ. वसंत मासाळ, दादासाहेब मडके यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी आमदार जयकुमार गोरे यांनी सर्व संबंधित विभागांचा आढावा घेतला. यावेळी माण तालुक्यातील ग्रामपंचायतीचे सरपंच व सदस्यांनी आपले गावचे प्रश्न मांडले यावेळी समितीतील अनेक विभागामध्ये पैसे घेतल्याशिवाय प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे पाठविले जात नाहीत. ज्या लाभार्थ्याने पैसे दिले त्यांचे प्रस्ताव वर जातात. ज्यांनी पैसे दिले नाहीत त्यांचे प्रस्ताव गहाळ केले जात असल्याचा आरोप अनेकांनी केला.
शिक्षणविभागा विषयी अनेक तक्रारारी होत आहेत तर शिक्षक नाहीत शिक्षकांची मुले खाजगी शाळेत जात आहेत. शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकांनी प्रयत्न करावेत व गटशिक्षणाअधिकाऱ्यांनी तालुक्यातील शिक्षकांची मुले खाजगी शाळेत किती जातात याचा अहवाल सादर करावा असा आदेश आमदार गोरे यांनी दिला. पाणलोटच्या कामांना गावातील राजकारणामुळे खोडा बसत असून जनतेने तुझे का माझे न करता पाणलोटचा निधी पडून असून ती कामे आपल्या गावात करुन घ्यावीत अधिकाऱ्यांना सहकार्य करून गावचा विकास करावा सिमेंट बंधाऱ्यामुळे तालुक्यात जलक्रांती झाली आहे. पूर्वी उन्हाळ्यात ७४ टँकर पाण्यासाठी लागायचे ते आता १४ वर आले असून जलयुक्त शिवार योजनेचा जन्म माण तालुक्यातुन झाला असल्याचे यावेळी आ. गोरे म्हणाले.
यावेळी कृषी सभापती शिवाजी शिंदे म्हणाले कृषीसहाय्यक गावात जात नसल्याने शासनाच्या कृषी योजना लोकांना माहिती मिळत नाही. तरी माण तालुक्यातील कृषी विभागाने आपल्या कारभारात सुधारणा करावी. आमसभेस अनेक ग्रामपंचायतीचे सरपंच व विविध विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
ललीता बाबर हिच्या अभिनंदनाचा ठराव मंजुर
या आमसभेत एम. के. भोसले यांनी बिजवडी, ता. माण येथे प्राथमिक आरोग्य केंद्र व्हावे या मागणीचा ठराव मांडला. या ठरावाला पं. सं. सदस्य बाबासाहेब हुलगे यांनी अनुमोदन दिले तर उपस्थितांनी या ठरावाला हात उंचावून पाठिंबा दिला. तसेच या आमसभेत नुकत्याच झालेल्या चिन येथे क्रीडा स्पर्धेत गोल्ड मेडल मिळविलेल्या माणदेशी मातीतील सुवर्णकन्या ललीता बाबर हिच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आला.