मंत्राने पापड मोडा अन् २५ लाख मिळवा ! श्याम मानव यांचे आव्हान; बुवाबाजीला बळी पडू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 11:34 PM2018-04-28T23:34:51+5:302018-04-28T23:34:51+5:30
सातारा : ‘चमत्कार अथवा मंत्राने बुवा-बाबांना काहीही करता येत नाही. साधा भाजलेला पापड सुद्धा मोडता येत नाही.
सातारा : ‘चमत्कार अथवा मंत्राने बुवा-बाबांना काहीही करता येत नाही. साधा भाजलेला पापड सुद्धा मोडता येत नाही. जे मंत्राद्वारे पापड मोडून दाखवतील त्यांना अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती रोख पंचवीस लाख रुपये देईल,’ असे आव्हान प्रा. श्याम मानव यांनी सातारा येथे दिले.
जादूटोणाविरोधी कायदा प्रचार व प्रसार अभियानाअंतर्गत शाहू कला मंदिर येथे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती सातारा जिल्हा शाखेच्या वतीने ‘बुवाबाजी, बळी स्त्रियांचा आणि वैज्ञानिक दृष्टिकोन’ या महत्त्वपूर्ण विषयावर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रात्यक्षिकासह प्रा. श्याम मानव यांनी मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल उपस्थित होत्या. समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष मधुकरराव कांबळे, समितीचे सातारा जिल्हाध्यक्ष प्रा. विलास खंडाईत, प्राचार्य डॉ. चंद्रशेखर येवले, अभियानाचे समन्वयक सुरेश झुरमुरे, मिलिंद बागवे, अनंता वाघमारे, प्रा. प्रवीण बोरगावे, प्रा. प्रमिला सरगडे, सुनील खरात यांची प्रमुख उपस्थिती होती.
आमचा देवा धर्माला विरोध नाही. हा लढा देवा-धर्माच्या नावावर सामान्य जनतेचे शोषण करणाऱ्या, तसेच लुबाडणाºयांविरोधात आहे. समाजातल्या अंधश्रद्धा प्रबोधनाद्वारे दूर करून वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणं आणि माणूसकीपूर्ण, स्वातंत्र्य, समता, बंधुता मानणारा व स्वीकारणारा आनंदी समाज निर्माण करणं हा अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा अजेंडा आहे, असे सांगत प्रा. श्याम मानव यांनी ज्ञान-विज्ञान, चिकित्सा, निर्भयता, आत्मविश्वास अशा अनेक मुद्द्यांना स्पर्श करत जादूटोणाविरोधी कायद्यातील बारा अनुसूचींवर विवेचन केले.
जिल्हाधिकारी श्वेता सिंघल म्हणाल्या, ‘अंधश्रद्धा या प्रामुख्याने स्त्रियांच्या मनामध्ये खोलवर रुजलेल्या असतात. रुढी-परंपरा बºयाचदा त्याला खतपाणी घालताना दिसतात. त्यामुळे जे अनिष्ट आहे ते नाकारून जे इष्ट आहे, ते स्त्रियांनी स्वीकारायला हवे. जर या पद्धतीने स्त्रियांनी वाटचाल केली, तर समाजमनातील अंधश्रद्धांचे समूळ उच्चाटन करण्यासंबंधी महत्त्वपूर्ण कार्य घडेल. अभियानाचे समन्वयक सुरेश झुरमुरे, प्रा. विलास खंडाईत यांनीही मार्गदर्शन केले. अरुण जावळे यांनी सूत्रसंचालन केले तर उपाध्यक्ष अनंता वाघमारे यांनी आभार मानले.
साताºयात आज कार्यशाळा
‘जादूटोणा कायदा व वैज्ञानिक दृष्टिकोन’ या विषयावर रविवार, दि. २९ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.