नव्या शैक्षणिक धोरणासाठी सज्ज राहा : अनिल पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:46 AM2021-09-10T04:46:14+5:302021-09-10T04:46:14+5:30
दहीवडी : नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल अपेक्षित असून, या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी सज्ज राहा, असे आवाहन ...
दहीवडी : नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल अपेक्षित असून, या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी सज्ज राहा, असे आवाहन रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील यांनी केले.
दहीवडी कॉलेजच्या सांस्कृतिक सभागृहात माण-खटाव परिसरातील रयत शिक्षण संस्थेच्या मध्य विभागातील शाखाप्रमुख व गटप्रमुखांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी मॅनेजिंग कौन्सिल सदस्य के.के. घाटगे, मध्य विभागाचे चेअरमन संजीव पाटील, माध्यमिक विभागाचे सहसचिव संजय नागपुरे, माध्यमिक विभाग मध्य विभागाचे अधिकारी राजेंद्र साळुंखे, प्राचार्य डॉ. सुरेश साळुंखे, प्राचार्य बी.एस. खाडे, उपप्राचार्य डॉ. बी.एस. बलवंत यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. पाटील पुढे म्हणाले, ‘सर्व शाखाप्रमुखांनी रयत शिक्षण संस्थेच्या सर्व शैक्षणिक धोरणांची प्रभावी अंमलबजावणी केली पाहिजे. नव्या अध्यापन पद्धती, डिजिटल तंत्रज्ञानाचा सर्वसमावेशक वापर, गुणवत्तापूर्ण उपक्रमांचे उत्कृष्ट नियोजन व अंमलबजावणी, शिक्षकांनी विद्यार्थी व पालकांशी सुसंवाद ठेवून कार्य करून प्रत्येक शैक्षणिक संकुलाची भरभराट करणे अपेक्षित आहे.
आढावा बैठकीत विद्यार्थी प्रवेश संख्या, ई-लर्निंगमधील विद्यार्थी उपस्थिती, विविध स्पर्धा परीक्षांमधील यशस्वी विद्यार्थ्यांची संख्या याबाबत आढावा घेण्यात आला. प्रास्ताविक राजेंद्र साळुंखे यांनी केले. सूत्रसंचालन अस्लम शेख यांनी केले. प्राचार्य बी.एस. खाडे यांनी आभार मानले.