कोरोनाचे विघ्न लवकर दूर कर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:45 AM2021-09-15T04:45:02+5:302021-09-15T04:45:02+5:30
सातारा : ना ढोल.. ना ताशा.. ना डीजेचा आवाज.. ना फटाक्यांची आतषबाजी. होता तो केवळ ‘गणपती बाप्पा मोरया.. पुढच्या ...
सातारा : ना ढोल.. ना ताशा.. ना डीजेचा आवाज.. ना फटाक्यांची आतषबाजी. होता तो केवळ ‘गणपती बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या’चा जयघोष. अशा भावपूर्ण वातावरणात मंगळवारी सातारकरांनी पाच दिवसांच्या घरगुती गणरायाला निरोप दिला. ‘कोरोनाचे विघ्न लवकर दूर कर’ असे साकडेही भाविकांनी बाप्पाला घातले.
गणेशोत्सवाची चाहूल लागल्यापासून घरोघरी आनंदाला उधाण आले होते. नागरिकांनी आपल्या लाडक्या बाप्पाची मोठ्या उत्साहात प्रतिष्ठापना केली. नागरिकांसह सार्वजनिक मंडळांनी नियमांंचे पालन करून यंदाचा गणेशोत्सव साजरा केला. जिल्हा प्रशासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत मंडळांनी यंदा कमी उंचीच्या गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना केली. अनेक मंडळांनी रस्त्यावर मंडपही उभारले नाहीत. पाच दिवसांच्या धामधुमीनंतर मंगळवारी घरगुुती गणेशमूर्तींचे विधिवत पद्धतीने विसर्जन करण्यात आले.
सातारा पालिकेकडून विसर्जनासाठी जलतरण तलावासह हुतात्मा स्मारक, कल्याणी शाळा, दगडी शाळा व बुधवार नाका येथे कृत्रिम तळ्यांची उभारणी करण्यात आली. या तळ्यात सकाळी सात वाजेपासूनच भाविक मूर्ती विसर्जनासाठी येत होते. याशिवाय फुटका तलाव, मंगळवार तळे, गौखले हौद, पंताचा गोट, रामाचा गोट, विश्वेश्वर मंदिर, न्यू इंग्लिश स्कूल, करिअप्पा चौक, सदर बझार, शाहूपुरी ग्रामपंचायत येथे जलकुंड ठेवण्यात आले होते. या कुंडातही भाविकांनी गणेश मूर्तींचे विसर्जन केले. कोरोना परिस्थिती पाहता नागरिकांनी विसर्जनासाठी गर्दी करू नये, असे आवाहन प्रशासनाने केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत नागरिकांनी विसर्जन सोहळा निर्विघ्न पार पाडला. सातारा शहरासह ग्रामीण भागातील भाविकांनी ओढे, तलाव व विहिरींमध्ये गणेशमूर्तींचे विसर्जन केले. साताऱ्यातील संगम माहुली येथे दिवसभर भाविकांची मूर्ती विसर्जनासाठी रेलचेल सुरू होती.
(चौकट)
कडेकोट पोलीस बंदोबस्त
विसर्जन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस विभागाच्या वतीने कृत्रिम तळी तसेच शहरात ठिकठिकाणी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. राज्य राखीव पोलीस दल, जलद प्रतिसाद पथक व होमगार्ड जवान जागोजागी तैनात करण्यात आले आहेत. शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी देखील दिवसभर कर्तव्य बजावत होते.
(पॉइंटर)
- नागरिक तसेच मंडळांडून कोणत्याही प्रकारचा डामडौल न करता मूर्ती विसर्जन करण्यात आले.
- शहरातील एकाही घरगुती गणेशाची मिरवणूक काढण्यात आली नाही.
- फटाक्यांची आतषबाजी व पारंपरिक वाद्यांचा गजरही यंदा झाला नाही.
- नागरिकांच्या सेवेसाठी ठिकठिकाणी जलकुंड व निर्माल्य कलश ठेवण्यात आले होते.
- बहुतांश नागरिकांनी या कुंडांमध्ये मूर्ती विसर्जित केल्या.
- गर्दी टाळण्यासाठी व प्रशासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेकांनी घरच्या घरीच गणेशाचे विसर्जन केले.