विष कालवणाऱ्यांची साहित्यातून बखोटी पकडा!
By admin | Published: January 3, 2016 12:44 AM2016-01-03T00:44:47+5:302016-01-03T00:49:39+5:30
हेमंत देसाई : साहित्यिकांनी समाजात सलोखा निर्माण करण्यासाठी लिहितं राहावं
सातारा : ‘अनेक माध्यमांतून अंधश्रद्धेचा प्रचार सुुरू असताना डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी केलेले बलिदान वाया जाईल, अशी भीती निर्माण होत आहे. या खुज्या भूमिकेला खतपाणी घालण्याची प्रवृत्ती शिवाजी-संभाजींचे नाव घेऊन समाजात विष कालवत आहे. दादागिरी, दहशतीचं वातावरण निर्माण करू पाहणाऱ्यांची साहित्याच्या माध्यमातून बखोटी पकडण्याचं काम फूल आणि पानामध्ये रमलेल्या साहित्यिकांनी करण्यासाठी पुढाकार घ्यावा,’ असे आवाहन ज्येष्ठ विचारवंत व पत्रकार हेमंत देसाई यांनी येथे केले.
येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरीत ग्रंथमहोत्सवामध्ये आयोजित केलेल्या ‘सामाजिक सलोखा व साहित्यिकांचा सहभाग’ या विषयावर आयोजित परिसंवादात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. या परिसंवादामध्ये विचारवंत प्रा. डॉ. कन्हैया कुंदप, ज्येष्ठ समीक्षक शंकर सारडा, प्रा. अनिल बोधे यांनी सहभाग घेतला. सामाजिक सलोखा राखण्याच्या हेतूने प्रत्येक समस्येला भिडण्यासाठी साहित्यिकांनी जाणीवपूर्वक पुढाकार घेतला पाहिजे, असा सूर या परिसंवादातून निघाला.
देसाई म्हणाले, ‘साहित्यिक मंडळींनी स्तुतिपाठकांच्या संप्रदायामधून बाहेर पडून समाजाकडे एका सम्यक नजरेतून पाहावे, असे आवाहन करतानाच साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपद निवडण्यासाठी वाद घालणारे साहित्यिक विषमता दूर करण्यासाठी पुढे येत नाहीत,’ अशी जहरी टीका हेमंत देसाई यांनी आपल्या विवेचनात केली. ‘सामान्यांचे शोषण थांबवून त्यांना सन्मान मिळविण्यासाठी लेखन करण्याबरोबरच भांडणे लावणाऱ्या एका विशिष्ट प्रवृत्तीला साहित्यामधून अद्दल घडविण्यासाठी साहित्यिकांनी प्रयत्न केले पाहिजेत,’ असे मतही त्यांनी व्यक्त केले.
प्रा. अनिल बोधे म्हणाले, ‘चांगलं साहित्य निर्माण करून समाजात सलोखा निर्माण करण्याचं काम साहित्यिकांचं आहे. ज्यांना सामाजिक भान आहे, अशीच मंडळी चांगले साहित्यिक होऊ शकतात. महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, यशवंतराव चव्हाण यांच्या साहित्यातून समाजातील प्रश्न मांडले गेले, आता तसे होताना दिसत नाही. साहित्यकृती निर्माण करून थांबण्यात धन्यता न मानता साहित्यिकांनी सामाजिक उपक्रमांमध्येही सहभागी व्हायला हवे.’
प्रा. डॉ. कन्हैया कुंदप यांनी सामाजिक सलोख्यासाठी महानुभाव साहित्याने दिलेले योगदान साहित्यप्रेमींपुढे मांडले. राजकारण आणि साहित्य या दोन गोष्टी सोबत घेऊन जात असताना दोन्हीमध्ये कधीही गफलत न करणाऱ्या यशवंतराव चव्हाण यांच्या अभ्यासपूर्ण उत्तराची मांडणीही त्यांनी केली.
शंकर सारडा यांनी सामाजिक प्रश्नांना भिडण्याची क्षमता साहित्यात नसल्याची खंत व्यक्त केली. ते म्हणाले, ‘जे. कृष्णमूर्ती यांची प्रवचने महाविद्यालयात शिकत असताना मी ऐकली. भारत-पाकिस्तान या दोन देशांमधील प्रश्नांसारखेच वर्षानुवर्षे भिजत पडलेले अनेक प्रश्न ठरवलं तर चुटकीसरशी सोडविण्यासारखे आहेत. मी या प्रश्नांची उत्तरे साहित्यातून सोडविण्याचा गेल्या साठ वर्षांत प्रयत्न केला; पण वयाच्या ८० व्या वर्षीही मला ती सापडली नाहीत. भाऊबंदकी, वाद, ईर्ष्या, संघर्ष या बाबी आपल्या समाजात कायम आहेत, साहित्यातून ही मांडली गेली; पण त्याची उत्तरे शोधक पद्धतीने मांडली गेली नाहीत, याचीच मला खंत आहे.’ ग्रंथमहोत्सवाचे कार्यवाह प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे यांनी परिसंवादात संवादक म्हणून काम पाहिले. (प्रतिनिधी)
मोदींच्या सुरक्षेची काळजी सबनिसांना कशाला?
अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी पंतप्रधान मोदी यांच्या पाक भेटीदरम्यान सुरक्षेविषयी काळजी व्यक्त केली होती. वास्तविक मोदींची काळजी घेण्यासाठी शासनाकडे स्वतंत्र खाती आहेत. सबनीस यांनी साहित्याची काळजी घ्यावी, अशी शालजोडी हेमंत देसाई यांनी आपल्या विवेचनातून मारली.