वडाचे म्हसवे गावाला पर्यटन स्थळाचा दर्जा मिळावा
By admin | Published: May 11, 2017 06:06 PM2017-05-11T18:06:44+5:302017-05-11T18:06:44+5:30
जावळीच्या सभापतींची मागणी : शिवेंंद्रसिंहराजेंचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र
आॅनलाईन लोकमत
सायगाव (सातारा), दि. ११ : जावळी तालुक्यातील वडाचे म्हसवे गावात जवळपास अडीच हेक्टर क्षेत्रात प्राचीन महाकाय वडाचे झाड आहे.या झाडाची ब्रिटिश गव्हर्नर ली वॉरनेर ने पाहणी करून याची रेशिडन्सी आॅफ रेकॉर्ड मध्ये आशिया खंडातील सर्वात महाकाय वडाचे झाड अशी नोंद केली आहे.येथे पर्यटक,निसर्गप्रेमी,वन्यजीवप्रेमी वनस्पती शास्त्रज्ञ यांची वर्दळ राहते. त्यामुळे या गावाला पर्यटन स्थळाचा दर्जा दिला जावा अशी मागणी या गावच्या स्नुषा विद्यमान सभापती अरुणाताई शिर्के यांनी केली आहे. त्यावर तात्काळ आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी याबाबतचे पत्र पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांना सादर केले आहे.
अतिशय प्राचीन असे हे महाकाय वडाचे झाड या गावात आहे.मुख्य झाडापासून अनेक वडाची झाडे निर्माण होऊन जवळपास सहा एकरमध्ये महाकाय वड येथे आहेत.त्यामुळे या गावाला वडाचे म्हसवे म्हणून ओळखले जाते.ब्रिटिश गव्हर्नर ली वॉरनेर ने याठिकाणी भेट देऊन पाहणी करीत आश्चर्यचकित होऊन आशिया खंडात असा महाकाय वड नसावा म्हणून याची नोंद देखील केली आहे.
सध्या हा परिसर वनविभागाच्या ताब्यात आहे; परंतु वनविभागाकडून या परिसराची म्हणावी तेव्हडी देखभाल होत नाही.तसेच पर्यटकांना सुविधा देखील पुरवल्या जात नाहीत. महाकाय वडाच्या झाडाचा अभ्यास करण्यासाठी देश-विदेशातून निसर्गप्रेमी,वन्यजीव प्रेमी, पर्यटक, अभ्यासक या गावाला भेट देत असतात.त्यामुळे सतत पर्यटकांची वर्दळ राहते. परंतु त्या प्रमाणात सुविधा मिळत नसल्यामुळे पर्यटकांची निराशा होते.
या गावाला पर्यटन स्थळाचा दर्जा मिळाल्यास पर्यटकांची गर्दी वाढून स्थानिकांना रोजगाराची संधी मिळेल.व अन्नसाखळी जपणाऱ्या या प्राचीन वडाचे जतन देखील होईल. यासाठी गावाला पर्यटन स्थळाचा दर्जा मिळावा यासाठी सभापती अरुणाताई शिर्के यांनी पाठपुरावा सुरु पाठपुरावा सुरु केला आहे. त्यादृष्टीने तात्काळ आमदार शिवेंद्रसिह राजे भोसले यांनी देखील पालकमंत्री विजय शिवतारे,जिल्हाधिकारी यांना पत्र देऊन २0१७- १८ च्या नियोजन आराखड्यात या गावाला पर्यटन स्थळाचा दर्जा देण्यात यावा अशी मागणी केली आहे. त्यानुसार लवकरच या गावाला पर्यटन स्थळात समावेश होणार हे निश्चित.
निधी मिळाल्यास विकासाची संधी उपलब्ध
सहा एकरमध्ये विस्तारलेल्या महाकाय वडाच्या झाडाचा हा परिसर वनविभागाच्या ताब्यात आहे.वनविभागाच्या दुर्लक्षामुळे मध्यन्तरी येथे झाडाच्या खोडाना आग लावण्याचा प्रयत्न झाला झाला होता.निसगार्चा हा अनमोल ठेवा चिरंतन ठेवण्यासाठी गावाला पर्यटन स्थळाचा दर्जा मिळाला तर निधी उपलब्ध होऊन रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊन गावाचा विकास साधला जाईल,त्यामुळे पर्यटन स्थळात म्हसवे गावाचा समावेश व्हावा अशी मागणी ग्रामस्थांमधून देखील होत आहे.
वडाच्या झाडांमुळे वडाचे म्हसवे गावाला एक वेगळे महत्व आहे.निर्सगाबाबत समाजात मोठी जागरूकता निर्माण झाली आहे.त्यामुळे दुर्मिळ वडाचे वृक्षांचे जतन व्हावे.तसेच पर्यटन स्थळाचा दर्जा मिळाल्यास रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.त्यामुळे वडाचे म्हसवे गावातील निसगार्चा हा ठेवा चिरंतन जतन ठेवण्यासाठी शासनाने या गावाला पर्यटन स्थळाचा दर्जा दयावा या साठी पाठपुरावा करणार."
- आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले
सातारा-जावळी विधानसभा मतदारसंघ.