जिल्हा संकटात अन्‌ १४ कोटींचे नियोजन कार्यालय बांधण्याचा घाट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:39 AM2021-05-14T04:39:18+5:302021-05-14T04:39:18+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : कोरोना महामारीने जिल्ह्यात दाणादाण उडवली असताना तसेच शासन-प्रशासन आरोग्य व्यवस्थेबाबत परिपूर्ण नसताना चौदा कोटी ...

Ghat to build planning office worth Rs 14 crore in district crisis! | जिल्हा संकटात अन्‌ १४ कोटींचे नियोजन कार्यालय बांधण्याचा घाट!

जिल्हा संकटात अन्‌ १४ कोटींचे नियोजन कार्यालय बांधण्याचा घाट!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : कोरोना महामारीने जिल्ह्यात दाणादाण उडवली असताना तसेच शासन-प्रशासन आरोग्य व्यवस्थेबाबत परिपूर्ण नसताना चौदा कोटी रुपयांचे नियोजन कार्यालय साताऱ्यात उभे राहणार आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात कचखाऊ भूमिका घेतलेल्या शासनाने नियोजन भवनाच्या टोलेजंग इमारतीसाठी प्रशासकीय मान्यता देऊन टाकली आहे.

सातारा जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेची मागणी आहे की, परिपूर्ण असे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय उभारावे तर शासन उभारते नियोजन भवन.. सध्याच्या परिस्थितीत गरज काय आणि शासन करतंय काय.. याची चर्चा सुरू झालेली आहे. जनतेची मागणी नसताना नेतेमंडळीच्या पुढाकाराने हे सभागृह उभे राहणार आहे. बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या सभागृहाच्या कामासाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे.

जिल्हा नियोजन समितीच्या इमारतीच्या बांधकामाकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाने मान्यता दिल्यानुसार १४ कोटी ९४४ लाख १० हजार इतक्या खर्चाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. ढोबळ स्वरूपात धरण्यात आलेल्या तरतुदीबाबत काम करतेवेळी विस्तृत अंदाजपत्रक करूनच काम हाती घ्यावे, या कामास प्रशासकीय मान्यता देण्यापूर्वी जागेच्या मालकी हक्काबाबतची खातरजमा करण्यात यावी, प्रस्तुत काम पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारित येत असल्यास संबंधित विभागाची तसेच महानगरपालिका व तत्सम प्राधिकरणे यांची पूर्वपरवानगी घ्यावी, अशा अटी शर्ती घालून शासनाने १४ कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता दिली.

जिल्हा नियोजन सभागृहाच्या इमारतसाठी बांधकामावर होणारा खर्च सातारा जिल्ह्याच्या जिल्हा वार्षिक योजनेत टाकण्यात येणार आहे. मोठी बांधकामे याच लेखा शीर्षकाखाली हा निधी खर्ची टाकण्यात यावा व मंजूर तरतुदीमधून भागविण्यात यावा, असे शासनाने बुधवारी केलेल्या आदेशात म्हटले आहे.

दरम्यान, शासन गेल्या कित्येक वर्षाच्या कालावधीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारू शकले नाही. हे महाविद्यालय उभे असते तर आत्ता जी सगळ्यांची धावाधाव सुरू आहे, ती कदाचित झाली नसती; मात्र वैद्यकीय महाविद्यालयाला गती देण्याऐवजी आता मोठा खर्च केला जाणार आहे. जी गती नियोजन समितीची इमारत उभारण्यासाठी दिली आहे, तशीच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या उभारणीसाठी दिसायला हवी अशी जनतेची मागणी आहे.

सध्या इमारतीची काय परिस्थिती आहे?

जिल्हा नियोजन समितीची इमारत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात उभी आहे. तीन मजली असलेल्या या इमारतीमध्ये जागा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. इमारतीच्या तळाला मोठे सभागृह आहे. या सभागृहामध्ये नियोजन समितीच्या सभागृहात जिल्हाधिकारी कार्यालयातील जास्त लोकांच्या उपस्थितीत बैठका घेण्यात येतात. वरच्या मजल्यावर जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांचे कार्यालय आहे. तर उरलेल्या जागेमध्ये खनिकर्म कार्यालय सुरू करण्यात आले आहे. निवडणुकीच्या काळातदेखील या इमारतीचा उपयोग होतो. इमारत पक्की स्लॅबमध्ये बांधली आहे.

नवी इमारत कुठे असणार आहे?

जिल्हाधिकारी कार्यालयात नवीन प्रशासकीय इमारत नुकतीच बांधण्यात आलेली आहे. त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांसह अतिरिक्त जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासोबतच परिषद हॉल तसेच विविध खात्यांची कार्यालय सुरू करण्यात आली आहेत. त्याच्याच शेजारी लागून एनआयसीची जुनी जीर्ण झालेली इमारत आहे. याठिकाणी तीन मजली नियोजन भवन उभारण्यात येणार आहे. तळमजल्यावर २५० लोक बसतील एवढा मोठा हॉल, पहिल्या मजल्यावर नियोजन समितीचे कार्यालय तसेच जिल्हा परिषदेमध्ये असलेले जिल्हा सांख्यिकी कार्यालय याठिकाणी इमारत पूर्ण झाल्यावर शिफ्ट करण्यात येणार आहे.

फोटो ओळ : सातारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन भवनाची इमारत उभी आहे.

Web Title: Ghat to build planning office worth Rs 14 crore in district crisis!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.