विरोध असूनही मोबाईल टॉवर उभारण्याचा घाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:35 AM2021-04-14T04:35:39+5:302021-04-14T04:35:39+5:30
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की, गोळेश्वर येथे एका खासगी कंपनीचा ...
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की, गोळेश्वर येथे एका खासगी कंपनीचा मोबाईल टॉवर उभारण्याचे काम सुरू आहे. त्या टॉवरच्या उभारणीला ग्रामस्थांनी विरोध केला आहे. जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी व येथील लोकवस्तीत हा टॉवर होत असल्याने त्याच्या रेडिएशनचा त्रास होऊन ग्रामस्थांसह लहान मुलांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. एचटी पॉवरलाईन सध्या येथे अस्तित्वात आहे. टॉवरबाबत ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी, तहसीलदार यांना निवेदन देऊन संबंधित टॉवरचे काम रद्द करण्याची मागणी केली आहे. ग्रामपंचायतीने टॉवर उभारण्यास परवानगी देऊ नये, असे आदेश यापूर्वी तहसीलदारांनी दिले होते. मात्र, तरीही ग्रामपंचायतीने परवानगी दिल्यामुळे ग्रामस्थांना अंधारात ठेवून व कोणतीही नोटीस न देता टॉवर उभे करण्याचा प्रयत्न सुरू आहे. ग्रामपंचायतीने संबंधितांना कोणत्या ठरावाने टॉवर उभारणीस पुन्हा परवानगी दिली, त्याबाबतचा खुलासा करण्याची मागणीही ग्रामपंचायतीला ग्रामस्थांनी केली आहे. ग्रामपंचायतीने तहसीलदारांच्या आदेशाची पायमल्ली केली आहे. आदेश झुगारून कंपनीला कोणत्या कारणाने परवानगी देण्यात आली? ग्रामस्थांचा मोठ्या प्रमाणात विरोध असतानाही कशी परवानगी दिली? असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला असून, संबंधित टॉवरचे काम तत्काळ बंद करावे, अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली? आहे.
फोटो : १३केआरडी०३
कॅप्शन : गोळेश्वर, ता. कऱ्हाड येथे ग्रामस्थांचा विरोध असूनही मोबाईल टॉवर उभारण्याचे काम सुरू आहे.