घाट रस्ते धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:36 AM2021-01-21T04:36:00+5:302021-01-21T04:36:00+5:30
........ प्राण्यांचा संचार वाढला सातारा : लॉकडाऊनमध्ये मानवांचा वावर कमी झाल्याने पशुपक्षी व वन्यजीवांचा वावर वाढला होता. रस्त्यांवर वाहनांची ...
........
प्राण्यांचा संचार वाढला
सातारा : लॉकडाऊनमध्ये मानवांचा वावर कमी झाल्याने पशुपक्षी व वन्यजीवांचा वावर वाढला होता. रस्त्यांवर वाहनांची संख्या रोडावली आणि पशुपक्षी व वन्यजीव मुक्तसंचार करीत होते. मात्र, आता सर्व पूर्वीप्रमाणेच सुरू झाले आहे. त्यामुळे वारंवार माणसांचं नागरिकांची गर्दी वाढली असती तरी वन्यजीवन मानवी वस्त्यांमध्ये संचार वाढला आहे.
.........
सोशल डिस्टन्सचा फज्जा
सातारा : कोरोना व लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर गेल्या नऊ महिन्यांपासून वडाप बंद होते. त्यामुळे या व्यावसायिकावर बेरोजगारी ओढावली होती. डिसेंबरमध्ये सर्व क्षेत्रे खुली झाली आहेत. त्यामुळे वर्षाखेरीस तीनचाकी रिक्षा, ट्रॅक्समधून प्रवासी वाहतूक सुरू झाली आहे. ग्रामीण भागात एसटीच्या ठरावीक फेऱ्या होत असल्याने, तसेच ज्येष्ठ नागरिकांना प्रवासावर निर्बंध असल्याने खासगी वाहतुकीला प्राधान्य दिले जात आहे.
...................
वणव्याचे प्रमाण वाढले
सातारा : वणवे लागण्याचे प्रमाण जिल्ह्यात वाढत चालले आहे. त्यामुळे डोंगर-दऱ्यासह जंगलातील गवत पूर्णपणे वाळून जात आहे. थोडीशी ठिणगी पडताच त्याला वणव्याचे स्वरूप प्राप्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे यावर्षी वणवे थांबविणे हे वन विभागासमोर सर्वात मोठे आव्हान ठरणार आहे.
.........
गावोगावी जनजागृती
सातारा : भुईंज (ता. वाई) येथील महामार्ग पोलीस केंद्रामार्फत ३२ व्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानास प्रारंभ करण्यात आला. अभियानाच्या पार्श्वभूमीवर तयार करण्यात आलेल्या चित्ररथामार्फत महामार्गालगत असणाऱ्या या गावांमध्ये जाऊन जनजागृती करण्यात येणार आहे.
........
डीजी कॉलेजमध्ये कार्यक्रम
सातारा : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय मुंबई, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सातारा, उपप्रादेशिक परिवहन विभाग सातारा, वाहतूक नियंत्रण शाखा सातारा आणि धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय सातारा यांच्या विद्यमाने बुधवारी धनंजय गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय रस्ते सुरक्षा आणि अपघात जागरूकता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
........
कारवाईची मागणी
सातारा : दुचाकी वाहनांच्या मागील नंबर प्लेटवर क्रमांकाबरोबरच काव्यपंक्ती, चारोळ्या, भाई, दादा असे विविध नावे लिहिण्याचे प्रमाण आजही कायम आहेत. याद्वारे कधी-कधी आपल्या प्रेमाचा, तर कधी जीवनाचा, तर कधी आपण किती मौल्यवान आहोत, याचा देखावा काव्यपंक्तीच्या सादरीकरणातून केला जात आहे.
.........
रक्तदान शिबिर
सातारा : गरजू रुग्णांसाठी रक्त कमी पडू नये, तसेच केंद्र व राज्य सरकारमार्फत केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत कृष्णानगर येथील बी द चेंज या ग्रुपने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात पन्नास जणांनी रक्तदान केले.
........
निर्बंध पाळणे गरजेचे
सातारा : जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची निवडणूक मतमोजणी झाली. हा निकाल ऐकण्यासाठी झालेल्या कार्यकर्त्यांच्या गर्दीमुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. कोरोनाचा धोका कमी झाला असला तरी महामारी संपलेली नाही. त्यामुळे अनलॉक प्रक्रियेत कोरोनाबाबतचे निर्बंध पाळणे गरजेचे आहे.
.......
लाईट सुरू करण्याची मागणी
सातारा : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील पाचवड ते दोशी विहीर या दरम्यानचे पथदिवे बंद असून, ते त्वरित सुरू करावेत, अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे. महामार्ग प्राधिकरणाकडून रस्ता देखभालीसाठी टोलवसुली केली जात आहे.
..........
वाहतुकीचा खोळंबा
सातारा : सातारा शहरातील मध्यवस्तीमधील रस्ते आधीच अरुंद असून, या रस्त्यावरच थांबलेल्या वाहनांमुळे वाहतुकीचा खोळंबा होत आहे. शहरातील बाजारपेठेत सर्वच रस्त्यालगत गाळे अतिक्रमण केले. त्यामुळे वाहन पार्किंगला जागा उरली नसल्याने ही वाहने रस्त्यावरील वाहतुकीचा अडथळा ठरत आहेत.
..........
अतिक्रमणे वाढली
सातारा : साईबाबा मंदिर गोडोली नाका रस्त्यावर भाजी विक्रेत्यांनी अतिक्रमण केल्याने वाहतुकीची कोंडी वाढली आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असून, नगरपालिकेने या भाजी विक्रेत्यांना हटवून त्यांची दुसरीकडे सोय करावी, अशी मागणी वाहनधारक करू लागले आहेत.
........
बटाट्याचा दर घसरला
सातारा : बटाटा उत्पादकांना प्रति क्विंटल नऊशे ते बाराशे रुपये दर मिळत असल्याने लागवडीचा खर्च नुकसानीत जात आहे. खटाव तालुका उत्तर भागातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. नवीन बटाट्याची आवक होत असल्याने बाजारात बटाट्याला २५०० ते २८०० रुपये असा उच्चांकी दर मिळत होता.
........
राज्याभिषेक सोहळा
सातारा : खटाव येथील छावा ग्रुपच्यावतीने नुकताच छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. ग्रुपच्या सदस्यांनी खटाव तालुक्यातील भूषणगड येथे जाऊन भवानी माता, हरणाईदेवीचे दर्शन घेतले. सायंकाळी कोरोनाचा प्रसार होऊ नये, यासाठी सर्व नियम पाळून छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळाची मिरवणूक काढण्यात आली.
......
इंटरनेट सेवेचा बोजवारा
बामनोली : जावळी तालुक्यात अनेक भागात इंटरनेट सेवेचा पुरता बोजवारा उडाला असून, खंडित सेवेमुळे नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. तो मोबाईल रेंज आणि इंटरनेटचा खेळखंडोबा झाल्याने पोस्ट बँकांचे व्यवहार ठप्प झाले आहेत. त्यामुळे नागरिकांची ससेहोलपट सुरू आहे. डोंगरदऱ्यांनी व्यापलेला आणि दुर्गम समजल्या जाणाऱ्या तालुक्यातील कोपऱ्यात नागरिकांच्या हातात मोबाईल पोहोचले असल्याने ग्राहकांकडून तक्रारी केल्या जात आहेत.
.,......
महाबळेश्वरला सुरक्षा सप्ताह
महाबळेश्वर : सध्या रस्त्यावर वाहनांची संख्या वाढू लागली आहे. वाहतुकीच्या नियमांचे पालन न केल्यास अपघात घडतात. सुरक्षित प्रवासामुळे एसटीने प्रवाशांत आपुलकीचे स्थान मिळविले असून, हा विश्वास वृद्धिंगत होण्यासाठी एसटी चालकांनी दक्ष राहावे, असे आवाहन महाबळेश्वर आगाराचे व्यवस्थापक नामदेवराव पतंगे यांनी केले.
.......
कर्मचारी नेमा
सातारा : साताऱ्यातील ग्रेडसेपरेटरमधून प्रवास करण्याच्या नियमावलीचा भंग राजरोस वाहनधारकांकडून होत आहे. अनेक वाहनधारक एकेरी वाहतुकीसाठी आरक्षित असणाऱ्या मार्गामध्ये स्वतःची वाहने पुढे नेतात. या नियमभंगामुळे अपघात घडण्याची शक्यता आहे.