घेवडा, सोयाबीन पिकांवर गोगलगाईचा हल्ला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:24 AM2021-07-19T04:24:39+5:302021-07-19T04:24:39+5:30
खटाव : खरीप पिकातील घेवडा व सोयाबीन पिकावर गोगलगाईच्या वाढत्या आक्रमणामुळे शेतात उगवलेल्या घेवडा व सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान ...
खटाव : खरीप पिकातील घेवडा व सोयाबीन पिकावर गोगलगाईच्या वाढत्या आक्रमणामुळे शेतात उगवलेल्या घेवडा व सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे खटाव तालुक्यातील शेतकरी हैराण झाला आहे.
मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावल्यानंतर शेतकऱ्यांनी जमिनीचा वाफसा आल्यानंतर लगेचच खरीप पिकांची पेरणी पूर्ण केली. बहुतांश पेरण्या पूर्ण होऊन पिकेदेखील उगवून आली आहेत. परंतु, गोगलगाईंचे शेतात वाढलेले प्रमाण यामुळे उगवून आलेल्या पिकाची पाने कुरतडून खाण्याच्या वाढत्या प्रमाणामुळे आता शेतकरी चिंतेत आहे.
खरीप पिकामध्ये प्रामुख्याने घेवडा व सोयाबीन ही पिके घेतली जातात.
बियाणे चढ्या दराने घेऊन पेरणी केल्यानंतर पोषक वातावरण तसेच योग्यवेळी पडलेला पाऊस, यामुळे पेरणीनंतर उगवून आलेली पिके व पाने गोगलगाई कुरतडून खात असल्यामुळे बरेच क्षेत्र रिकामे दिसून येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर आता नवे संकट उभे ठाकले आहे. पोषक वातावरण जरी असले तरी अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी तुषार सिंचन पद्धतीचा अवलंब करून उगवून आलेल्या पिकांना योग्य तेवढे पाणी देण्याचेदेखील काम सुरू केले आहे. अशातच या पाने खाणाऱ्या व कोवळ्या अंकुराची नासाडी करणाऱ्या गोगलगाईच्या संकटाला शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागत आहे.
(चौकट..)
कृषी विभागाने लक्ष देणे गरजेचे...
पावसाने पेरणीनंतर ओढ दिल्यामुळे आधीच शेतकरी चिंतेत असतानाच पुन्हा पावसाचे आगमन झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या असतानाच सुरुवातीलाच पीक उगवतानाच गोगलगाईचे वाढलेले प्रमाण व त्यांचे पाने कुरतडण्याचे वाढते प्रमाण यामुळे पीक उगवून येऊनही त्याचा काहीच फायदा होणार नाही. कृषी विभागाकडून वेळीच शेतकऱ्यांना माहिती व मार्गदर्शन मिळावे, अशी मागणी होत आहे.
(कोट..)
आतापर्यंत पालेभाज्या तसेच फळभाज्यांवर गोगलगाईचे आक्रमण होत होते; परंतु सोयाबीन तसेच घेवड्याच्या उगवलेल्या अंकुरावर तसेच त्याची पाने कुरतडून खाण्याची ही पहिलीच वेळ आहे.
- वैभव मोरे, कृषी विक्रेते
१८खटाव
कॅप्शन : खटाव तालुक्यात शेतात उगवलेल्या पिकावर व पानावर गोगलगाईचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. (छाया : नम्रता भोसले)