राज्यात जागा वाटपाचे गुऱ्हाळ; साताऱ्यात महाविकास आघाडी एकसंध
By नितीन काळेल | Published: March 5, 2024 06:57 PM2024-03-05T18:57:45+5:302024-03-05T18:58:37+5:30
मतदारसंघ कोणाकडे निश्चीत नसलातरी विचारमंथनातून बराच उलगडा होणार
सातारा : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता काही दिवसात लागणार असून राज्यात महाविकास आघाडी आणि महायुतीत जागा वाटपाचे गुऱ्हाळ सुरूच आहे. अशातच सातारा मतदारसंघ आघाडीत कोणाकडे जाणार हे माहीत नसलेतरी नेते एकसंध असल्याचे दिसून येत आहे. यासाठीच बुधवारी आघाडीतील प्रमुख वरिष्ठ नेत्यांची बैठक साताऱ्यात होत असून यातून मतदारसंघाचा बराच उलगडा होणार आहे.
१९९९ ते २०१९ च्या २० वर्षातील सातारा लोकसभा निवडणुकीचा विचार करता आघाडी आणि युतीतच सामना झाला. एकवेळचा अपवाद वगळता दोन्ही गटात ज्या पक्षाकडे मतदारसंघ त्यांचाच उमेदवार निवडणुकीत उतरला. पण, आताची स्थिती वेगळी आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीत दोन गट पडले आहेत. यामुळे महायुतीततरी सातारा मतदारसंघ कोणाकडे हे अजुन स्पष्ट नाही. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीचा अजित पवार गट हे तिघेही सातारा मतदारसंघ पदरात पाडून घेण्यासाठी आसुसले आहेत. आजच्या स्थितीततरी कोणा एका पक्षाला मतदारसंघ मिळेल असे ठामपणे निश्चित नाही. यासाठी तीन पक्षांच्या वरिष्ठ नेतृत्वाची बैठक होऊन मतदारसंघ कोणाकडे राहणार हे ठरणार आहे.
तर महाविकास आघाडीत शरद पवार यांची राष्ट्रवादी साताऱ्यात उमेदवार उभा करणार हे जवळपास स्पष्ट झाले आहे. पण, या राष्ट्रवादीचा उमेदवार कोण हे निश्चीत नाही. खासदार श्रीनिवास पाटील यांची लोकप्रियता आहे. पण, त्यांचे वयोमान पाहता ते यावेळी उमेदवार असणार का याविषयी साशंकता आहे. तर त्यांच्याएेवजी दुसरे ताकदीचे नाव आजतरी पवार गटाकडे नाही. त्यातच शरद पवार एेनवेळी दुसऱ्या पक्षातून कोणी आले तर त्यांना उमेदवारी देणार का ? याविषयीही राजकीय चर्चांना उधाण आलेले आहे. अशातच महाविकास आघाडीची बैठक होत आहे. यामध्ये बऱ्याच गोष्टी स्पष्ट होणार आहेत.
साताऱ्यातील काॅंग्रेस कमिटीत ही बैठक होत आहे. माजी मुख्यमंत्री पृश्वीराज पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, माजी मंत्री बाळासाहेब पाटील, शशिकांत शिंदे, सतेज पाटील, शिवेसना ठाकरे गटाचे उपनेते प्रा. नितीन बानुगडे-पाटील यांच्यासह इंडिया आघाडीतील घटक पक्ष, परिवर्तनवादी आणि पुरोगामी विचारांच्या संघटनांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. यामध्ये सातारा लोकसभा मतदारसंघ निवडणुकीविषयी बराच खल होणार आहे. यामध्ये साताऱ्याची निवडणूक कशी जिंकायची, काय रणनिती आखायची याविषयी चर्चा होऊ शकते. यामुळे या बैठकीकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. कारण, यातून आघाडी एकसंध असल्याचाही संदेश जाणार आहे. तसेच यातून निवडणुकीत फायदा घेण्याचाही हेतू असू शकतो.
आघाडीची पुन्हा बैठक; सर्व प्रमुख नेते एकत्र..
महाविकास आघाडीची बैठक दीड महिन्यांपूर्वी साताऱ्यातील राष्ट्रवादी भवनमध्ये झाली होती. त्यानंतर आताची ही बैठक दुसरी असून निर्णायक ठरणार आहे. यासाठी आघाडीतील जिल्ह्यातील सर्व प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे साताऱ्याचा खासदार आघाडीचा करण्याचा विडाच एकप्रकारे उचलण्यात येणार असल्याचे चित्र आहे. तर काही दिवसांपूर्वीच काॅंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सातारा मतदारसंघाची माजी मुख्यमंत्री पृश्वीराज चव्हाण यांच्यासाठी मागणी केलेली. या पार्श्वभूमीवर काॅंग्रेस कमिटीतच आघाडीची बैठक होत असल्याने यावर काय चर्चा होणार का ? हेही स्पष्ट होणार आहे.
मुंबईत अजित पवार गटाची सातारा, माढ्याबाबत बैठक..
महायुतीत सातारा मतदारसंघाचा तिढा आहे. तसेच माढाबाबतही वाद आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचीही बुधवारी मुंबईत बैठक होणार आहे. माढा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या ताब्यात घेण्यासाठी विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. बुधवारच्या बैठकीत सातारा आणि माढा युतीत कोणाकडे राहणार हे जवळपास स्पष्ट होणार आहे.