Satara: मायणीत गाढवाने घेतला बालिकेचा चावा, गंभीर जखमी; गाढव मालकावर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2023 11:27 AM2023-10-09T11:27:52+5:302023-10-09T11:28:55+5:30
डोक्याचा चावा घेऊन फरफटत नेले
मायणी : खटाव तालुक्यातील मायणी येथील बसस्थानकाच्या पाठीमागे राहणाऱ्या तीन वर्षांच्या बालिकेच्या डोक्याला गाढवाने चावा घेतल्याने बालिका गंभीर जखमी झाली. माहिरा मोहसीन मुजावर (वय ३, रा. मायणी, ता. खटाव) असे जखमी झालेल्या बालिकेचे नाव आहे. उपचारासाठी कऱ्हाड येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, या घटनेनंतर गाढव मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी मोकाट जनावरांबाबत परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत घटनास्थळावरून व प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, मायणी येथील बसस्थानकाच्या पाठीमागे राहणारी माहिरा हातात पैसे घेऊन खायला आणण्यासाठी निघाली होती. त्यावेळी रस्त्यावर उभा असलेल्या गाढवाने तिच्या डोक्याचा चावा घेऊन फरफटत नेले, त्यावेळी आजूबाजूला असलेल्या ग्रामस्थांनी तिची गाढवापासून सुटका केली.
मात्र, गाढवाचा चावा इतका गंभीर होता की, तिच्या डोळ्यावरील बाजूस व डोक्यावरील केसाचा पूर्ण भाग रक्तबंबाळ झाला. तिच्यावर मायणी येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी विटा, मिरज या ठिकाणी नेले. मात्र या ठिकाणी योग्य उपचार न मिळाल्याने तिला शेवटी कऱ्हाड या ठिकाणी उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पाळीव गाढव सुरक्षिततेची कोणतीही काळजी न घेता गाढव मालक राजेंद्र धोत्रे यांनी गाढव सोडल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेचा पोलिसांत गुन्हा नोंद झाला असून, अधिक तपास पोलिस निरीक्षक महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार आनंदा गंबरे करत आहेत.
मोकाट जनावरांमुळे सतत लहान-मोठे अपघात
मायणी मुख्य बाजारपेठ, मुख्य मार्गावर अनेक मोकाट कुत्री, माकडे, गाढवे तसेच डुकरे फिरत असल्याने परिसरात सतत लहान-मोठे अपघात घडत आहेत. तसेच कुत्री, डुकरे, गाढव व माकडांचा कळप परिसरामध्ये असल्याने परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.