तापाने बालिका दगावली

By Admin | Published: September 4, 2015 12:27 AM2015-09-04T00:27:29+5:302015-09-04T00:27:29+5:30

दोडामार्गातील घटना : जिल्ह्यात स्वाइनचे चार संशयित; पाचजणांना डेंग्यू

The girl gets angry | तापाने बालिका दगावली

तापाने बालिका दगावली

googlenewsNext

कसई दोडामार्ग : दोडामार्ग म्हावळणकर कॉलनीतील वेदिका महेश म्हावळणकर या नऊ महिन्यांच्या बालिकेचा तापाने गुरुवारी मृत्यू झाला. तिला ताप आल्याने बुधवारी गोवा बांबुळी येथे हलविण्यात आले होते. दरम्यान, कणकवली आणि कुडाळ येथे स्वाइन फ्लूचे संशयित प्रत्येकी दोन असे जिल्ह्यात चार रुग्ण आढळले असून, कणकवली तालुक्यात डेंग्यूचे पॉझिटिव्ह तीन आणि कुडाळमध्ये एक व मालवणमध्ये एक असे एकूण पाच रुग्ण आढळले आहेत.
वेदिका हिला गेल्या दोन दिवसांपूर्वीपासून ताप येत होता. बुधवारी तिची तब्येत खालावल्याने तिचे वडील महेश म्हावळणकर यांनी सावंतवाडी येथील खासगी दवाखान्यात औषधोपचारासाठी नेले होते, परंतु तेथे तापाचे योग्य निदान होत नसल्याने गोवा बांबुळी येथे नेण्याचा सल्ला खासगी दवाखान्यातील डॉक्टरांनी दिला. त्यामुळे तिला सायंकाळी गोवा येथे हलविले. मात्र, गुरुवारी पहाटे सहा वाजता तिचा मृत्यू झाला. तिच्या निधनाचे निदान झाले नाही. न्यूमोनियामुळे तिचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. मृतदेह म्हावळणकरवाडीत आणल्यानंतर परिसरातील लोकांनी व राजकीय पुढाऱ्यांनी म्हावळणकर यांचे सांत्वन केले.
दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात अद्ययावत सुविधा व तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध नसल्याने रुग्णांची मोठी परवड होत आहे.
बालरोगतज्ज्ञ हे पद गेली कित्येक वर्षे रिक्त आहे. या रुग्णालयात बालरोगतज्ज्ञ उपलब्ध असता तर माझ्या मुलीचे प्राण वाचले असते, अशी खंत म्हावळणकर यांनी व्यक्त केली. (वार्ताहर)


कणकवलीत तिघांना डेंग्यू
कणकवली येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल झालेल्या मयूर गणेश राठोड (वय ५, रा. रवळनाथनगर) आणि लावण्या एकनाथ सावंत (वय दीड वर्षे, रा. कसवण, कलेश्वरवाडी) या दोघांमध्ये स्वाइनची लक्षणे आढळली आहेत, तर हेमंत प्रभाकर टिकले (४५, रा. शिवाजीनगर, कणकवली), बिहारी आदिवासी आदमणी (४०, रा. मसुरकर कॉम्प्लेक्स, कलमठ) आणि प्रमोद पांडुरंग साटम (४८, रा. साटमवाडी, जानवली) या तिघांच्या रक्तनमुन्याच्या स्पॉट टेस्ट डेंग्यू पॉझिटिव्ह आल्या आहेत. यापैकी बिहारी आदमणी यास जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. उपजिल्हा रुग्णालयात स्वाइनच्या रुग्णांसाठी विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.


कुडाळात डेंग्यूचा दुसरा रुग्ण
दरम्यान, कुडाळातील सोनवडे येथे बुधवार व गुरुवारपासून कोल्हापूर व पुण्याच्या पथकाने तपासणी मोहीम राबविली. यामध्ये २५ जणांच्या रक्तांचे नमुने घेण्यात आले असून, यातील दोघेजण स्वाइन फ्लूचे संशयित असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली, तर तेजस माळकर (वय १८, रा. कोतरा), लावण्या साळगावकर (३ वर्षे, रा. चेंदवण), अक्षय सावंत (१८, रा. कुडाळ) या तिघाजणांना अधिक उपचारासाठी ओरोस येथे हलविण्यात आले, तर अनंत पारकर यांना डेंग्यूची लागण झाल्याचे निदान झाले आहे.
- आणखी वृत्त /हॅलो १ वर

मालवण तालुक्यात डेंग्यूचा तिसरा रुग्ण
मालवण : सिंधुदुर्गात तापसरीच्या साथीनंतर आरोग्य यंत्रणेत खळबळ माजली आहे. मालवणात डेंग्यूसह स्वाइन फ्लूचा शिरकाव झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. तालुक्यातील कोळंब भटवाडी येथील राजश्री शंकर कांडरकर (६५) या महिलेला डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे डेंग्यू रुग्णांची संख्या तीनवर पोहोचली आहे.

Web Title: The girl gets angry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.