झिंगलेल्या बालकांचं जमावाकडून मुंडन
By admin | Published: March 22, 2015 12:15 AM2015-03-22T00:15:46+5:302015-03-22T00:15:46+5:30
तांदुळआळीतील धक्कादायक प्रकार : मद्यविक्रेत्यांवर कारवाई करण्याची जोरदार मागणी
सातारा : मोठ्यांची नक्कल छोट्यांनी केली तर आई-वडील त्याचे कौतुक करतात. परंतु हिच नक्कल जर आपल्या मुलाने मद्यपी तळीरामाची केली तर आई-वडीलच नाही तर संपूर्ण समाजाला चिंतेत पाडणारी गोष्ट ठरते. असाच एक प्रकार शनिवारी येथील राजवाडा परिसरात घडला.
येथील राजवाडा परिसरातील प्रतापसिंह महाराज नगरवाचनालयाजवळ तांदुळआळीत दुपारी बाराच्या सुमारास अवघ्या आठ-दहा वर्षांची चार बालके बसली होती. त्यांच्याजवळ पाण्याची बाटली आणि त्यामध्ये मद्य होते. तर एका कागदावर चकना शेंगदाणे-फुटाणे होते. आळीपाळीने ही बालके बाटलीतील मद्य पित होते. त्यानंतर शेंगदाणेही खात होते. काहीवेळानंतर त्यातील दोघांना उलट्या होऊ लागल्या. तेथे जवळच असलेल्या काही लोकांच्या हा प्रकार निदर्शनास आला.
त्यानंतर नागरिकांनी त्या बालकांकडे ‘गाव कोणते, तुम्ही इथे कसे आलात,’ याविषयी चौकशी केली. परंतु त्या बालकांनी नागरिकांनाही थांगपत्ता लागू दिला नाही. ‘पोलिसांच्या ताब्यात देतो,’ असे ज्यावेळी त्यांना धमकावण्यात आले.
तेव्हा त्यांनी आपली ओळख सांगितली. झालेला प्रकार त्यांच्या पालकांच्या कानावर घालण्यासाठी काहीनी फोनही लावले. परंतु त्यांच्या पालकांशी संपर्क होऊ शकला नाही. शेवटी या बालकांनी केलेल्या कृत्याची शिक्षा म्हणून नागरिकांनी पुढाकार घेऊन त्यांचे मुंडन केले. नंतर त्यांना समज देऊन सोडून देण्यात आले. पालकांनी आपल्या मुलांवर लक्ष ठेवले पाहिजे, असे यावेळी नागरिकांतून बोलले जात होते.
लहानपणीच मुलांवर चांगले संस्कार घडावेत, यासाठी पालक लक्ष देतात; परंतु सध्या पोटापाण्यासाठी दिवसभर कष्ट करणाऱ्या पालकांच्या मुलांकडे कोण बघणार. आपली मुले दिवसभर काय करतात, याचा थांगपत्ता पालकांना नसतो. मुले शाळेत जातात, एवढेच समाधान आजच्या पालकांना आहे की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. (प्रतिनिधी)