लाकडाच्या टेकूला उभ्या असलेल्या शाळेत मुली पहा कशा शिकताहेत शाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2018 12:01 AM2018-12-18T00:01:46+5:302018-12-18T00:03:17+5:30
वाशी (ता. करवीर) येथील कन्याशाळेच्या खोल्यांची मोठ्या प्रमाणात पडझड झाल्याने इमारत धोकादायक बनली आहे. शाळेच्या इमारतीस टेकूचा आधार द्यावा लागत असल्याने मुलींना जीव मुठीत धरून ज्ञानार्जन करावे लागत आहे.
सडोली (खालसा) : वाशी (ता. करवीर) येथील कन्याशाळेच्या खोल्यांची मोठ्या प्रमाणात पडझड झाल्याने इमारत धोकादायक बनली आहे. शाळेच्या इमारतीस टेकूचा आधार द्यावा लागत असल्याने मुलींना जीव मुठीत धरून ज्ञानार्जन करावे लागत आहे. त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला असतानासुद्धा शिक्षण विभागाला जाग कधी येणार, असा सवाल पालक करीत आहेत.
वाशी (ता. करवीर) येथे जिल्हा परिषदेच्या १ ली ते ७ वी पर्यंतच्या मुलींसाठी कन्याशाळा, तर मुलांसाठी विद्यामंदिर या दोन शाळा आहेत. या दोन्ही शाळांत सुमारे ६०० विद्यार्थी शिक्षणाचे धडे गिरवत आहेत. या दोन्ही शाळांची पटसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या शाळेची गुणवत्ता चांगली आहे, तर शाळेच्या मुलांनी अनेक क्रीडा प्रकारांत मोठी मजल मारली आहे.
या शाळेच्या पाच खोल्यांचे बांधकाम १९९६ साली झाले आहे. पण ते निकृष्ट दर्जाचे झाल्याने वीस वर्षांच्या अगोदरच खोल्यांच्या भिंतीची मोठ्या प्रमाणात पडझड झाल्याने ही इमारत धोकादायक बनली आहे. याही परिस्थितीतीत मुली शिक्षणाचे धडे गिरवत असून, यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे.
प्राथमिक शिक्षण विभागाच्या निष्क्रिय कारभारामुळे निव्वळ दप्तर दिरंगाई व भोंगळ कारभारामुळे गेली चार वर्षे शाळेला मरणयातना सोसाव्या लागत आहेत, असा आरोप पालकांनी केला आहे. तसेच एकाच खोलीमध्ये दोन दोन वर्ग भरवले जातात.
या शाळेतील इमारतीच्या दुरवस्थेचा फायदा घेऊन काही ग्रामस्थांनी चक्क जनावरे बांधण्यासाठी शाळेचा वापर सुरू केला असून, याकडे ग्रामपंचायत प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने पालकांच्या संतापात अधिकच भर पडली
आहे.
नेतेमंडळींनी काय केले
या गावातील नागरिकांनी गेल्या वीस वर्षांत जिल्हा परिषद अध्यक्ष ते पंचायत समिती सदस्य अशी मोठ मोठी पदे उपभोगली असूनसुद्धा शाळेची अवस्था बिकट बनली आहे. या नेतेमंडळींनी शाळेसाठी काय केले, असा प्रश्न ग्रामस्थ करीत आहेत.
शाळा दुरुस्तीसाठी व्यवस्थापन समितीने या अगोदरही अनेकवेळा प्रस्ताव पाठवले, पण शिक्षण विभागाने मात्र याकडे दुर्लक्ष केल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे.
- के. एस. रानगे, अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती, वाशी.
शाळेची गुणवत्ता व शिक्षकांच्या प्रयत्नातून शाळेची शैक्षणिक प्रगती झाली आहे; परंतु शिक्षण विभागाच्या आंधळ्या कारभारामुळे आमच्या मुलांना जीव मुठीत घेऊन शिक्षण घ्यावे लागत आहे. शाळेचा प्रश्न न सोडवल्यास आंदोलन करणार आहे.
- रणजित पाटील, पालक