दहा वर्षातील खासदारकीचा लेखाजोखा मांडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:36 AM2021-01-22T04:36:09+5:302021-01-22T04:36:09+5:30
सातारा : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यामुळे सातारा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभे राहत आहे. त्यांच्यावर टीका करणाऱ्यांनी दहा ...
सातारा : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यामुळे सातारा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभे राहत आहे. त्यांच्यावर टीका करणाऱ्यांनी दहा वर्षांमधील कामाचा लेखाजोखा मांडावा, असे आव्हान काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शिवराज मोरे यांनी केले.
येथील काँग्रेस कमिटीमध्ये युवक काँग्रेसच्या माध्यमातून ग्रामपंचायतींमध्ये निवडून आलेल्या सदस्यांच्या सत्कार सोहळ्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी आपली भूमिका मांडली.
खासदार उदयनराजे भोसले यांनी काही दिवसांपूर्वी आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे काम रखडले, अशी टीका केली होती. त्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर बोलताना शिवराज मोरे म्हणाले, ‘आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्यामुळे सातारा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभे राहत आहे. त्यांनी विकासकामाला कधीही विरोध केला नाही. कोणत्याही पक्षाने विकासकाम करू दे, त्याला त्यांनी कधीच बाधा आणली नाही. त्यांनीच सातारा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला परवानगी दिली. मधल्या काळात देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्त्वाखाली भाजपचे सरकार असताना एक वीटदेखील लावली गेली नाही.’
दरम्यान, ज्यांना माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या कामाबाबत शंका आहे, त्यांनी त्यांच्या काळात झालेले शासन आदेश पहावेत. सातारा हे जिल्ह्याचं ठिकाण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची
राजधानी
आहे, त्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारणीचे काम त्यांनी हाती घेतले. आता राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्यासोबत आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी वारंवार बैठका घेतल्या आहेत, असेही मोरे यांनी स्पष्ट केले.