वाठार स्टेशनला रुग्णवाहिका द्या अन्यथा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:28 AM2021-05-28T04:28:04+5:302021-05-28T04:28:04+5:30
वाठार स्टेशन : आरोग्य विभागाला वेळोवेळी सांगूनही वाठार स्टेशनला अद्याप रुग्णवाहिका दिली जात नाही. ही समस्या तातडीने मार्गी न ...
वाठार स्टेशन : आरोग्य विभागाला वेळोवेळी सांगूनही वाठार स्टेशनला अद्याप रुग्णवाहिका दिली जात नाही. ही समस्या तातडीने मार्गी न लागल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू, असा इशारा फलटण कोरेगाव मतदारसंघाचे क्षेत्रप्रमुख अमोल आवळे यांनी दिला आहे.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे की, मोठ्या लोकसंख्येचे गाव तसेच मोठी बाजारपेठ असलेल्या कोरेगाव तालुक्यातील वाठार स्टेशन येथे जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य केंद्र राष्ट्रीय महामार्गाजवळ आहे. त्यामुळे या आरोग्य केंद्रात सतत गर्दी असते. या रस्त्यावर सतत अपघात होत असतात. अशी परिस्थिती असताना दोन वर्षांपूर्वी येथील रुग्णवाहिका पेटली. तेव्हापासून या केंद्रास रुग्णवाहिका मिळावी यासाठी मंत्री, आमदार प्रयत्न करत आहेत.
पंधरा दिवसांपूर्वी वाठार स्टेशनला कोरोना सेंटरचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते झाले. याही वेळी तात्काळ रुग्णवाहिका देणार अशी घोषणा झाली. मात्र, परिस्थिती अद्याप ‘जैसे थे’ आहे. रुग्णवाहिका नसल्याने येथील रुग्ण बाहेर पाठवायचा असेल तर वीस किलोमीटरसाठी चार हजारांची मागणी केली जाते. त्यामुळे येथील जनता त्रासली आहे. आठ दिवसांत रुग्णवाहिका उपलब्ध न केल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू, असा इशारा आवळे यांनी दिला आहे.