कोरोना नमुने २४ तासांत द्या; अन्यथा लॅबची परवानगी रद्द : जिल्हाधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:29 AM2021-06-02T04:29:19+5:302021-06-02T04:29:19+5:30

सातारा : कोरोना टेस्ट केलेले नमुने २४ तासांत दिले नाहीत तर संबंधित लॅबची मान्यता रद्द करण्याची कारवाई करण्यात ...

Give corona samples within 24 hours; Otherwise the permission of the lab will be revoked: Collector | कोरोना नमुने २४ तासांत द्या; अन्यथा लॅबची परवानगी रद्द : जिल्हाधिकारी

कोरोना नमुने २४ तासांत द्या; अन्यथा लॅबची परवानगी रद्द : जिल्हाधिकारी

Next

सातारा : कोरोना टेस्ट केलेले नमुने २४ तासांत दिले नाहीत तर संबंधित लॅबची मान्यता रद्द करण्याची कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिला आहे.

वाढत्या रुग्णसंख्येमुळे नवीन रुग्णांचे निदान लवकर होणे गरजेचे आहे. त्यामुळे योग्य उपचार वेळेत होऊन मृत्युसंख्येत घट होण्यासाठी रॅट टेस्टिंग तसेच आरटीपीसीआर टेस्टिंगची महत्त्वाची भूमिका असणार आहे. नमुन्यांचे अहवाल २४ तासांच्या आत आपल्या कार्यक्षेत्रातील शासकीय यंत्रणेस (तालुका आरोग्याधिकारी) यांना ईमेलद्वारे किंवा व्हॉटस‌्ॲपद्वारे अहवाल कळविणे बंधनकारक आहे. नियम पाळणार नाही त्या लॅबची मान्यता रद्द करणार असल्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी कोरोना टेस्टिंग करणाऱ्या जिल्ह्यातील सर्व लॅबना कळविले आहे.

टेस्टिंग करण्यात आलेल्या पॉझिटिव्ह व निगेटिव्ह अशा सर्व रुग्णांच्या नोंदी ऑनलाईन पोर्टलवर तत्काळ भरण्यात याव्यात, जेणेकरून मिळणाऱ्या अहवालावरून योग्य ती उपचारात्मक व प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी जिल्हा प्रशासनास मदत होईल.

संशयित रुग्णांचा नमुना तपासणीसाठी घेतल्यानंतर ऑनलाईन पोर्टलवर नोंद करताना आरटीपीसीआर चाचणीसाठी नमुना घेतेवेळेस एसआरएफ आयडीवर त्याचा संपूर्ण सविस्तर पत्ता, सध्या वास्तव्य करीत असलेला (जिल्हाबाहेरील असेल तर) किंवा आधारकार्डवर असलेला पत्ता प्रमाणित करून नमूद करण्यात यावा. संपूर्ण पत्ता नमूद केला तरच पॉझिटिव्ह रुग्णाचा शोध घेणे व संपर्कात आलेल्यांचा शोध घेऊन उपाययोजना राबविण्यास जिल्हा प्रशासनास सोयीस्कर होईल. तसेच रुग्णांचा सुरू मोबाईल नंबर लिहिण्यात यावा, यासाठी मिस्ड कॉल देऊन प्रत्यक्ष रुग्णाचा मोबाईल नंबर आहे का, याची खात्री करून घ्यावी.

पॉझिटिव्ह आल्यानंतर रुग्णाचा अहवाल देतेवेळी ऑनलाईन पोर्टलवर नोंद करून आयसीएमआर नंबरसंहित तो तत्काळ देण्यात यावा. फॅसिलिटी ॲपमध्ये ऑटकम अपडेशन (डिस्चार्ज, डेथ, रेफर) करतेवेळेस आयसीएमआर नंबरशिवाय अपडेट करता येत नाही, याची नोंद घ्यावी. तसेच रुग्णांचा अहवाल देतेवेळेस ज्या नावाने आपल्या चाचणी केंद्रास परवानगी दिलेली आहे. त्याच लेटरहेडवर संबंधितांस अहवाल देण्यात यावा.

शक्य झाल्यास त्यांचा नमुना तपासणीचा अहवाल मोबाईलवर ऑटोमॅटिक मेसेज जाण्यासाठी क्लाऊड पॅथॉलॉजी या साॅफ्टवेअरचा वापर करावा.

या सर्व सूचनांचे अत्यंत काटेकोरपणे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे; अन्यथा आपल्या लॅबची मान्यता पूर्णपणे रद्द करण्यात येईल व आपल्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी जिल्ह्यातील कोरोना चाचणी करणाऱ्या लॅबना कळविले आहे.

Web Title: Give corona samples within 24 hours; Otherwise the permission of the lab will be revoked: Collector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.