साहित्यातून बळीराजाच्या व्यथा मांडा !

By admin | Published: December 4, 2015 10:12 PM2015-12-04T22:12:03+5:302015-12-05T00:25:47+5:30

कृषिजागर साहित्य संमेलन : शहरातील नागरिकांनी शेतकऱ्यांना समजून घ्यावे; रा. रं. बोराडे यांचे आवाहन

Give pain to the victims! | साहित्यातून बळीराजाच्या व्यथा मांडा !

साहित्यातून बळीराजाच्या व्यथा मांडा !

Next

सातारा (प्रा. एम.एम.कलबुर्गी व्यासपीठ) : ‘भारताला कृषिप्रधान देश म्हटले गेले असले तरी आता शेती ही फायद्याची राहिलेली नाही. शेती आपल्याला जगवू शकते, हा शेतकऱ्यांचा आत्मविश्वास गेलेला आहे. शेती करण्यात अर्थ नाही, ही शेतकऱ्याची मानसिकता झाली असून, ती भयावह आहे. व्यवसायभिमुख, शेतीपूरक व्यवसायासाठी शेतकऱ्यांची मानसिकता निर्माण होण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. साहित्याबरोबरच प्रत्येकात कृषिजागर निर्माण होणे गरजेचे आहे,’ असे मत ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य रा. रं. बोराडे यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र साहित्य परिषद, शाहूपुरी शाखेच्या वतीने खासदार शरद पवार यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त ‘कृषिजागर’साठी आयोजित केल्या दुसऱ्या सातारा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. व्यासपीठावर विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची नियोजित अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, स्वागताध्यक्ष आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, नगराध्यक्ष विजय बडेकर, उपनगराध्यक्ष जयवंत भोसले, मुख्याधिकारी अभिजित बापट, साहित्य परिषदेचे रवींद्र बेडकिहाळ, किशोर बेडकिहाळ, संमेलनाचे मुख्य निमंत्रक विनोद कुलकर्णी आणि मान्यवर उपस्थित होते.
प्राचार्य बोराडे म्हणाले, ‘आज सर्वांपुढे शेतीबाबतचा आव्हानात्मक प्रश्न आणि त्याला वेगळ्या पद्धतीने भिडावे लागणार आहे. धरण कशासाठी बांधली गेली याचा विचार झाला पाहिजे. आज पाण्यासाठी छुपे युद्ध सुरू आहे. एकवेळ पाण्यासाठी प्रत्यक्षात मारामारी होण्याची वेळ येणार आहे. परंतु हे पाणी शेतकऱ्यांचे आहे. धरणे नसताना पावसाचे पाणी झिरपून शेतकऱ्याच्या बांधापर्यंत येत होते; परंतु पाणी अडवून झिरपणे बंद झाले. केवळ शेतीमध्ये काही नाही हे भीषण आणि दाहक सत्य
स्वीकारले पाहिजे. शेतकऱ्याच्या नवीन पिढीला बाहेर काढले पाहिजे. प्रत्येक शेतकऱ्याच्या एका मुलाला नोकरीची हमी सरकारने घ्यायला हवी.’
संमेलनाचे प्रमुख पाहुणे विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी, शेतकऱ्यांची व्यथा साहित्यिकाच्या व्यासपीठावर येण्याची वेळ आली आहे. भविष्य नसलेला, सर्वंच बाबतीत परावलंबी असलेला व्यवसाय म्हणजे शेती. त्यांच्यात वेदना आहे, दु:ख आहे आणि त्यातूनच त्यांच्याकडून निर्मिती होते. अशा प्रकारच्या साहित्यासाठी शेतकरी साहित्य परिषदेची निर्मिती करू, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी प्रा. मिलिंद जोशी, प्रमोद आलटकर, डॉ. उमेश करंबळेकर, डॉ. राजेंद्र माने, जिल्हा मराठी पत्रकार संघाचे हरीष पाटणे, संमेलनाचे कार्याध्यक्ष संतोष यादव, राजू गाडसे, शिरीष चिटणीस, महाराष्ट्र साहित्य परिषद शाहूपुरी शाखेचे पदाधिकारी, संमेलन समितीचे पदाधिकारी, सदस्य विविध जिल्ह्यातील साहित्यिक, रसिक आणि सातारकर मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)


श्रीपाल सबनीस यांचा सत्कार
डॉ. श्रीपाल सबनीस, रवींद्र बेडकिहाळ, स्वागताध्यक्ष आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मनोगत व्यक्त केले. संमेलनाच्या प्रारंभी हुतात्मा कर्नल संतोष महाडिकआणि वर्षभरात काळाच्या पडद्याआड गेलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून संमेलनाचे उद्घाटन झाले. ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल डॉ. श्रीपाल सबनीस यांचा सातारकरांच्या वतीने आणि साहित्य परिषद शाहूपुरी शाखेच्या वतीने रामराजे आणि मान्यवरांच्या हस्ते सपत्निक सत्कार करण्यात आला. संमेलनाचे मुख्य निमंत्रक विनोद कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले.

Web Title: Give pain to the victims!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.