पराभव खुल्या मनाने स्वीकारला, तुमच्या पराभवाची कारणं द्या; उदयनराजेंचा शिवेंद्रसिंहराजेंवर पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2022 02:19 PM2022-07-29T14:19:09+5:302022-07-29T14:19:39+5:30

तुम्ही स्वार्थापोटी जनसामान्यांना जवळ करता, कार्यकर्त्यांचे विकपॉईंट हेरुन त्यांच्या नाडया आवळता. जनतेमुळे आम्ही आहोत, ही भावना आमची, तर जनता आमच्यामुळे आहे, अशी भावना तुमची.

Give reasons for your defeat, Udayanraje Bhosale counter attack on Shivendra Raje Bhosale | पराभव खुल्या मनाने स्वीकारला, तुमच्या पराभवाची कारणं द्या; उदयनराजेंचा शिवेंद्रसिंहराजेंवर पलटवार

पराभव खुल्या मनाने स्वीकारला, तुमच्या पराभवाची कारणं द्या; उदयनराजेंचा शिवेंद्रसिंहराजेंवर पलटवार

googlenewsNext

सातारा : आमचा पराभव आम्ही खुल्या मनाने स्वीकारला आहे. विजय झाला त्यावेळी हुरळूनही गेलो नाही. आमच्या लोकसभेतील पराभवाची कारणं विचारताय तर, आधी तुमच्या विधानसभा पोटनिवडणुकीच्या पराभवाची कारणं द्या. ती जी कारणे असतील तीच आमची समजा, असा पलटवार करताना, खासदार उदयनराजे भोसले यांनी, बँक कायदेशीर मर्ज केली, असे म्हणता, तर मर्ज करण्यासाठीच बँक स्थापन केली होती का? एक बँक तुमच्या अंदाधुंद, भ्रष्ट कारभाराने बुडीत काढली; पण त्याकरिता दुसऱ्या बँकेचाही गळा घोटला. सहकार बझारचे रेस्टॉरंट केले, ते रेस्टॉरंटही बंद पाडले. हे प्रकार सहकारातील तत्त्वज्ञानात येत नाहीत, परंतु हाच तुमचा खरा वारसा आहे, हे तुम्ही दाखवून दिले आहेे, अशा खरमरीत शब्दात उदयनराजेंनी प्रतिउत्तर दिले आहे.

खासदार उदयनराजे भोसले यांनी नवी दिल्ली येथून दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, आमचा आणि तुमचा मार्ग वेगळा तर आहेच, तसेच अन्य काही बाबी आणि उद्दिष्टदेखील वेगळी आहेत. आम्ही जनसामान्यांना आमचे समजतो, नि:स्वार्थी मनाने काम करतो, तुम्ही स्वार्थापोटी जनसामान्यांना जवळ करता, कार्यकर्त्यांचे विकपॉईंट हेरुन त्यांच्या नाडया आवळता. जनतेमुळे आम्ही आहोत, ही भावना आमची, तर जनता आमच्यामुळे आहे, अशी भावना तुमची. सहकारी संस्था सभासदांच्या मालकीच्या आणि उद्धारासाठी आहेत, ही आमची धारणा, तर सहकार म्हणजे स्वतःची खासगी मालमत्ता ही तुमची धारणा. असा जो काही फरक आहे, तो मूलभूत फरक आहे. त्यामुळे दोघांमधील विचारांची उंची व खोलीसुध्दा वेगळी आहे. दुसऱ्याच्या पराभवाची कारणे विचारणारे तुम्ही स्वतःला अहंकारी आणि अहंमन्यदेखील समजता आहात. अहंकाराने सर्वनाश होतो, हे तुम्ही जाणीवपूर्वक विसरत आहात.

अजिक्यतारा कारखाना निवडणूक लागल्यावर एकदा भ्रष्ट कारभाराबाबतची अपराधी भावना घेऊन तुम्ही आमच्याकडे आला होता. निवडणुकीत लक्ष घालू नका, मी सर्व चुकांची दुरुस्ती करतो ,असेदेखील म्हणाला होता. हे इतक्या लवकर कसे विसरलात? तुम्ही म्हणता त्याप्रमाणे जर आम्ही छाती काढून सभासदांपुढे गेलो तर, तुमची छाती जाऊन, नुसत्या बरगडया राहतील, याची पहिल्यांदा नोंद घ्या आणि मग आमच्या छातीकडे या, असेही निवेदनात म्हटले आहे.

तुमचे ते काम आणि आमचा तो स्टंट, असा शोध तुम्ही लावलेला आहे. ती तुमची वैचारिक दिवाळखोरी आहे, असे नमूद करून, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी पुढे नमूद केले आहे की, आम्ही ज्यावेळी एखादा प्रकल्प अंतिम टप्प्यात येतो, त्यावेळी त्याची निधीच्या आकडेवारीसह आणि तांत्रिक बाबींसह माहिती देतो. तुमच्यासारखे प्रत्येक टप्प्यावर मुख्याधिकारी, जिल्हाधिकारी, आयुक्त. दादा यांच्याजवळ जाऊन बातमी आणि त्यांचा फोटो छापत नाही. तुम्हाला इतर ठिकाणी कोणी विचारतच नाही, त्यामुळे त्याची बातमी नाही आणि फोटोसुध्दा नाही. तुम्ही परफेक्शनिस्ट नव्हे, तर फंक्शनिष्ट आहात. असला प्रकार तुमचा तुम्हालाच शोभून दिसतो. हा फरकसुध्दा एक आपल्या मार्गातील वेगळेपण दाखवणारा आहे.

सातारा-कराड हे जंक्शन नाही त्यामुळे येथून गाडी सुरू करता येत नाही, याचेदेखील यांना भान नाही. सध्या ३८ रेल्वेगाड्या सातारा आणि कराडमधून धावतायत. एकदा डोळ्यात अंजन घालून बघा म्हणजे दिसेल आणि समजेल. सातारा शहरात रस्त्यांची कामे साविआमार्फत वेळोवेळी झाली आहेत. आमच्या घरासमोरील रस्ता झाला किंवा नाही झाला तरी सामान्य सातारकरांच्या गल्ली-बोळातील रस्ते झाले पाहिजेत, अशी आमची प्रशासनाला विनंती सूचना आहे. विकासपुरुष कदाचित तुम्हीच आहात. कारण विकासरत्नांचा वारसा लाभलेला आहे. असेदेखील खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी फटकारले आहे.

Web Title: Give reasons for your defeat, Udayanraje Bhosale counter attack on Shivendra Raje Bhosale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.