सातारा शिवसेनेला द्या; ९५ची पुनरावृत्ती घडवू
By admin | Published: September 4, 2014 11:25 PM2014-09-04T23:25:36+5:302014-09-04T23:27:39+5:30
ओंबळे-पार्टे : शिवेंद्रसिंहराजेंवर केली जोरदार टिका
मेढा : सातारा-जावली विधानसभा मतदार संघ शिवसेनेला मिळाल्यास १९९५ची पुनरावृत्ती करण्याचा चंग जावळी तालुक्यातील शिवसैनिकांनी बांधला असून हा मतदार शिवसेनेला मिळावा, अशी एकमुखी मागणी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केली असल्याची माहिती जावळी तालुक्यातील शिवसेनेचे नेते एकनाथ ओंबळे व एस. एस. पार्टे गुरुजी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर सातारा मतदार संघ हा शिवसेनेच्या वाट्याला मिळावा या मुख्य मागणीसह तालुक्यातील शिवसैनिकांच्या भावना जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी या पत्रकार परिषदेचे आयोजन केल्याची माहिती यावेळी एकनाथ ओंबळे व पार्टे गुरुजी यांनी दिली. यावेळी भारतीय विद्यार्थी सेनेचे तालुका प्रमुख सचिन करेंकर, मेढा शहर प्रमुख सचिन जवळ, उपतालुकाप्रमुख संजय सुर्वे, सचिव गणेश पार्टे, प्रशांत तरडे, श्रीहरी गोळे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना एकनाथ ओंबळे म्हणाले, जावळी तालुक्याने १९९५ मध्ये इतिहास घडविला. त्यानंतर २००२ साली जावळी पंचायत समितीवर आपले वर्चस्व राखले होते. शिवसेनेकडे आज एकही तालुक्यातील मोठा नेता नसूनही गेल्या तीन विधानसभा निवडणुकीत दोन क्रमांकाची मते मिळविली आहेत. आजही प्रत्येक गावातील शिवसैनिकांनी हा विधानभा मतदारसंघ शिवसेनेला मिळावी, अशी मागणी केली आहे. सातारा- जावली विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे मतदार जास्त असून सहयोगी असणाऱ्या भाजप व आरपीआय यांच्या साथीने शिवसेना १९९५ ची पुनरावृत्ती घडवेल, असा ठाम विश्वास ओंबळे यांनी यावेळी व्यक्त केला. (प्रतिनिधी)
एकनाथ ओंबळे यांनी विद्यमान आमदार व राष्ट्रवादीवर जोरदार टिका केली. तालुक्यात विकास नुसता कागदावरच झाला असून महू-हातगेघर प्रकल्प, पुनर्वसनाकडे आमदार व पालकमंत्र्यांनी गांभीर्याने लक्ष दिले नाही. आजही तालुक्यात २० गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. जावळी तालुक्यात पवनचक्क्यांचा रस्ता होतो, मात्र इतर रस्त्यांना निधी मिळत नाही. ही जनतेच्या डोळ्यात धुळफेक करण्याचे काम सुरू आहे. या साऱ्याला जनता कंटाळली आहे. शाळांची बोगस बांधकामे, काही गावांमध्ये अजिबात न झालेला विकास याबाबतही यावेळी कडाडून टिका करण्यात आली.