इतनी शक्ती हमे देना दाता, मन का...!

By admin | Published: February 19, 2015 10:01 PM2015-02-19T22:01:32+5:302015-02-19T23:44:40+5:30

भीती पळाली : समाजकंटकांच्या कृतीला विद्यार्थ्यांचे विवेकी उत्तर

Give us so much power, mind ...! | इतनी शक्ती हमे देना दाता, मन का...!

इतनी शक्ती हमे देना दाता, मन का...!

Next

जगन्नाथ कुंभार - मसूर कवठे, ता. कऱ्हाड येथील श्री जोतिर्लिंग विद्यालयात महाशिवरात्रीच्या सुटीत समाजकंटकांनी शाळेतील संगणक, फर्निचर, कागदपत्रे शाळेच्या पटांगणावर व समोरील ओढ्यात टाकली होती. याचा कोणत्याही प्रकारच्या भीतीचा लवलेश न बाळगता बुधवारी मुलांनी शंभर टक्के हजेरी लावत शाळा नव्या उत्साहाने भरली, याठिकाणी मंगळवारी काही असा प्रकार घडला होता, असे कोणाला वाटलेच नाही. येथील प्रशासनाने विद्यालयाच्या काळ्या रंगाने विद्रूप केलेल्या भिंती पेंटर आणून पूर्वीसारख्या केलेल्या होत्या. त्यामुळे या भिंतीवर कुठे काय लिहिले होते, हे दुर्बिणीतूनही दिसत नव्हते. या सर्व घडल्या प्रकाराने कर्मचारी वर्ग हिरमुसला होता; परंतु ही मुले जणू आपल्या गुरूजनांना सांगत होती. ‘सर तुम्ही भिऊ नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत,’ या मुलांचे हसरे चेहरे पाहून कर्मचारी वर्गातही काहीही घडलेच नाही, असे वातावरण होते. सोमवारी रात्री याठिकाणी समाजकंटकांनी शाळेची केलेली नासधूस म्हणजे या सरस्वतीच्या मंदिराची केलेली अवहेलना होती. या घटनेची माहिती वाऱ्यासारखी गावात पसरली जो-तो या विद्यालयाकडे पळत सुटला. पाहतो तर या विद्येच्या प्रांगणात व समोरील ओढ्यात जणू काही पांढरे ढगच उतरलेत की काय, अशा पद्धतीने कागद विस्कटले होते. जमलेला जमाव हतबल होऊन या घटनेकडे पाहत होता. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सातारा येथून श्वानपथक व ठसेतज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते. श्वानपथकाने सकारात्मक दिशा दिली असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. पोलीस गावातील व्यक्तींच्याकडे कसून चौकशी करत आहेत. आमच्या शाळेची बदनामी करणाऱ्या समाजकंटकांना लवकर पकडून त्यांना शिक्षा करावी. आम्हाला शाळेत येताना भीती वाटत होती; परंतु येथील शिक्षक वर्ग चांगला असून, आमच्यावर आई-वडिलांप्रमाणे प्रेम करत असल्याने आम्हाला आमची शाळा म्हणजे घरच वाटते,’ असे विद्यार्थ्यांनी ‘लोकमत’ला सांगितले. विद्यालयास धैर्यशील कदम, हिंदुराव चव्हाण, डॉ. शंकरराव पवार, यशवंत शिक्षण संस्था खराडेचे अध्यक्ष जयसिंगराव जाधव, टी. एस. खुडे, कालगाव विद्यालयाचे मुख्याध्यापक जगन्नाथ कुंभार आदींनी भेट दिली. मसूरच्या पोलीस उपनिरीक्षक रेखा दुधभाते यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार प्रकाश कोकाटे, पोलीस हवालदार एफ. एच. शेख, सुधाकर भोसले, व्ही. आर. शिंगटे, एस. व्ही. शेलार, एस. जे. घाडगे, एस. पी. साळुंखे, ए. जे. भादुले तपास करत आहेत. शाळा माय-माऊली माझी! शाळा ही देत असते, ज्ञानामृत पाजून ती प्रत्येकाला घडवत असते. जो तिच्या सान्निध्यात आला, त्याच्या आयुष्याचे सोनेच होते. शाळेअभावी आयुष्याची राखरांगोळी झालेले अनेकजण आपण पाहतो. त्यामुळे शाळेला माऊली मानून तिच्या छायेखाली आपले आयुष्य घडविण्याचा प्रयत्न प्रत्येक विद्यार्थ्यानं करायला हवा. अनेक प्रसंग येतात आणि हवेच्या झुळकीप्रमाणे निघूनही जातात. शाळा सोडायची नाही, मग वाटेल ते होवो, असा निश्चय विद्यार्थ्यांनी केला.

Web Title: Give us so much power, mind ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.