आरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चा आक्रमक, उदयनराजे भोसलेंनी केले हे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2018 11:32 AM2018-07-22T11:32:52+5:302018-07-22T14:21:34+5:30
आषाढी एकादशीची वारी कोणत्याही अडथळ्याविना पार पडू द्यावी, असे आवाहन साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केले आहे.
सातारा - आषाढी एकादशीची वारी कोणत्याही अडथळ्याविना पार पडू द्यावी, असे आवाहन साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केले आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांनी राज्यासह पंढरपुरातही काही ठिकाणी बस तोडफोड, चक्काजाम, ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून एसआरपीच्या तुकड्यांसह जादा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
आषाढी एकादशी सोमवारी (23 जुलै) आहे. त्यासाठी श्रीसंत तुकाराम, श्रीसंत ज्ञानेश्वर या प्रमुख संतांच्या पालख्यांसह शेकडो दिंड्या व 10 लाखांपेक्षा जास्त भाविकांचे पंढरपुरात आगमन होत आहे. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या आरक्षणाची अधिसूचना जाहीर करावी आणि मगच पंढरपुरात महापूजेसाठी यावे, असा आक्रमक पवित्रा मराठा क्रांती मोर्चाने घेतला आहे.
(Video - 'मुख्यमंत्री विठ्ठलाच्या महापूजेसाठी येणार नाहीत')
दरम्यान, मराठा क्रांती मोर्चाचा आक्रमक पवित्रा पाहता उदयनराजे भोसले यांनी आंदोलकांना आवाहन केले आहे. ''विठुमाऊलीला भेठण्यासाठी लाखो भाविक आणि वारकरी हरिनामाचा जप करत पंढरीत आषाढी आणि कार्तिकी वारी करतात.आशिया खंडातीलच नव्हे, तर जगातील सर्वात मोठी परंपरा लाभलेला हा महामेळा मोठ्या भक्तीभावाने शेकडो वर्षांपासून सुरू आहे. हा भक्ती मेळावा मोठ्या उत्साहात आणि मंगलमय वातावरणात पार पाडण्याची जबाबदारी सर्वांची आहे'',असे उदयनराजेंनी म्हटले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिकवणीचा आदर्श आज संपूर्ण जग घेत असताना राज्य आणि केंद्र सरकारनेही शिवरायांच्या आदर्श विचारांनुसार सर्वांना समान न्याय देण्याच्या भावनेतून तातडीने पाऊले उचलण्याची गरज असल्याचेही उदयनराजे यांनी म्हटलं आहे. काहीही झालं तरी आपल्या वारीची परंपरा सुरळीत पार पाडण्यासाठी सर्वांनी सकारात्मक योगदान द्यावे, असे आवाहन उदयनराजे यांनी केले आहे.
(विठ्ठलाच्या पूजेपासून मला कोणीही रोखू शकत नाही, पण...)
दरम्यान, विठ्ठलाची पूजा करण्यापासून मला कोणीही रोखू शकत नाही. पण पंढरपुरात वारकऱ्यांच्या जीवाला धोका करण्याचा काही संघटनांचा प्रयत्न आहे. त्यामुळे 10 लाख वारकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न असल्याने मी पंढरपुरात विठ्ठलाच्या महापुजेला जाणार नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.