‘जलयुक्त शिवार’साठी युवकांना गती द्या
By admin | Published: February 18, 2015 10:46 PM2015-02-18T22:46:49+5:302015-02-18T23:46:33+5:30
एन.जे. पवार : सकारात्मक उपक्रम राबविण्याचे केले आवाहन
सातारा : ‘आजच्या युवकाला दिशा दिली तर क्रांतिकारी म्हणून पुढे येतील. त्यांना योग्य गती द्या, म्हणजे ‘जलयुक्त शिवार’ अभियान निश्चितपणे यशस्वी होईल,’ अशी अपेक्षा शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन.जे. पवार यांनी व्यक्त केली.
शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर व जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जलयुक्त शिवार’ अभियानांतर्गत दुष्काळ निवारणात विद्यार्थ्यांचा सहभाग यावर येथील नियोजन भवनात कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, मुख्य कार्यकारी अधिकारी जी. श्रीकांत, प्र. कुलगुरू डॉ. अशोकराव भोईटे, विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक डॉ. डी. के. गायकवाड, उपजिल्हाधिकारी पराग सोमण, जलतज्ज्ञ डॉ. अविनाश पोळ, शिवाजी विद्यापीठ सिनेट सदस्य अमित कुलकर्णी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जे. पी. शिंदे, अशासकीय सदस्य विजयराव पंडित, सुजित आंबेकर आदी उपस्थित होते.
भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करून या कार्यशाळेला सुरुवात करण्यात आली. सुरुवातीला माजी उपमुख्यमंत्री दिवंगत आर. आर. पाटील यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. कुलगुरू डॉ. पवार म्हणाले, ‘शिवाजी विद्यापीठामध्ये विहीर खोदून पाण्याच्याबाबतीत आम्ही स्वयंपूर्ण झालो. तर मग दुष्काळी गावे योग्य नियोजन केल्यास स्वयंपूर्ण का होणार नाहीत.’
जी. श्रीकांत म्हणाले, ‘पावसाचे पडणारे पाणी योग्य उपाययोजना करून ते जमिनीमध्ये जिरविले पाहिजे. काही गावे दत्तक घ्यायची. त्या गावातील पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य घालवून द्यायचे. टँकरमुक्त धोरण याला सर्वोच्च प्राधान्य द्यायचे. विद्यार्थ्यांची ताकद ही खूप मोठी आहे. त्यासाठी या अभियानामध्ये त्यांचा सहभाग हे या अभियानाचे फलित ठरेल.’ अविनाश पोळ म्हणाले,‘भविष्यामधील युद्ध हे पाण्यावरून होईल. त्याचबरोबर शहरी आणि ग्रामीण भाग यांच्यात पाण्यावरून संघर्ष असेल. ‘जलयुक्त शिवार’ अभियान ही एक तुम्हाला संधी आहे. या संधीचा पूर्णपणे वापर करा.’
यावेळी डॉ. भोईटे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
पराग सोमण यांनी स्वागत केले. अमित कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. विजयराव पंडित यांनी आभार मानले. यावेळी जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांचे प्रतिनिधी उपस्थित होते. (प्रतिनिधी)