प्रकल्पासाठी जमीन दिली; पण पाणी मिळेना! : पाटणच्या जनतेची शोकांतिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 12:12 AM2018-05-19T00:12:14+5:302018-05-19T00:12:14+5:30
पाटण : तालुक्याच्या भौगोलिक परिस्थितीचा फायदा घेण्यासाठी अनेक लहान-मोठे प्रकल्प येथे उभारण्यात आले. या प्रकल्पांसाठी जमिनी संपादित करून अनेक वर्षे झाली आहेत. मात्र, अद्याप संबंधित प्रकल्प रखडले आहेत. प्रकल्पांसाठी जमीन देऊनही तालुक्याला पाण्याचा लाभ मिळालेला नसून हीच प्रकल्पग्रस्तांची शोकांतिका आहे.
पाटण तालुक्यातील अपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सकारात्मक प्रयत्नांची गरज आहे. पाटण हा अतिवृष्टीचा तालुका असल्याने याठिकाणी शासनाच्या तिजोरीतून कोट्यवधी रुपये खर्च करून प्रकल्पाची कामे हाती घेतली गेली. १५ ते २० वर्षांपूर्वी येथे हे प्रकल्प उभारण्यास सुरुवात झाली. मात्र, अद्याप ते प्रकल्प पूर्ण झालेले नाहीत. प्रकल्प पूर्ण झाले असते तर पूर्ण क्षमतेने पाणी अडविले गेले असते़ तालुक्यातील हजारो एकर क्षेत्र ओलिताखाली आले असते. सध्या तालुक्यात दुष्काळी परिस्थती आहे.
शेतकरी पाण्याअभावी चिंताग्रस्त झाले आहेत.
साखरी चिटेघर, निवकणे आणि बिबी येथील सलतेवाडीजवळ लहान प्रकल्प उभारण्यात आले आहेत. हे प्रकल्प लवकर मंजूर होऊन ते लवकर पूर्ण होण्यासाठी तत्कालीन आमदार विक्रमसिंह पाटणकर यांनी परिश्रम घेतले होते. मात्र, अद्याप हे प्रकल्प पूर्णत्वास गेलेले नाहीत. मोरणा-गुरेघर धरणाचे पाणी डाव्या तीरावरून १६ किलोमीटर आणि उजव्या तीरावरून ३२ किलोमीटर कालवे काढून शेतीसाठी पुरविण्यात येणार होते. मात्र, कालव्यांचे काम न झाल्यामुळे धरणात पाणीसाठा असूनही पाणी शेतीपर्यंत पोहोचू शकलेले नाही. या विभागातील शेतकऱ्यांना कर्ज काढून मोरणा नदीमधून पाणी उचलावे लागत आहे.
तालुक्यातील असा एकही प्रकल्प नाही की, त्यात राजकारण झाले नाही. या राजकारणाचा फटका त्या विभागातील जनतेला बसत आहे़ केरा नदीवर साखरी-चिटेघर येथे शासनाच्या जलसपंदा विभागाच्या वतीने मातीचे धरण बांधून लघुपाटंबधारे प्रकल्प उभारण्यात आला. त्यामध्ये पूर्ण क्षमतेने पाणीही अडविले आहे़ मात्र, उर्वरित कामासाठी निधी उपलब्ध होत नसल्याने हे काम अपूर्ण अवस्थेत राहिले आहे. प्रकल्प पूर्ण होऊनही जनतेला त्याचा लाभ मिळत नाही. बीबी-सलतेवाडी येथील येडोबा नाल्यावर संपूर्ण मातीच्या बंधाºयाचे काम जवळपास ८० टक्के पूर्ण असून, राहिलेल्या कामाच्या माती परीक्षणासाठी सुमारे पाच वर्षांपासून पाठपुरावाच सुरू आहे. जमिनी देऊन अपूर्ण राहिलेल्या प्रकल्पाकडे केवळ पाहण्याची वेळ प्रकल्पग्रस्तांवर आली आहे. या तालुक्यातील अपूर्ण प्रकल्पांना तत्काळ निधी मिळविण्यासाठी लोकप्रतिनिधींनी याकडे सकारात्मक नजरेने
पाहणे गरजेचे आहे. विधानसभेमध्ये त्यासाठी आवाज उठवायला हवा.
आमदार दोन; आवाज उठवणार कोण?
पाटण तालुक्याला दोन आमदार असून, ते तालुक्यातील सर्वसामान्यांच्या प्रश्नावर एकत्र होऊन विधानसभेत आवाज उठविताना दिसत नाहीत़ इतर कारणांनी ते एकत्र येतात; पण सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी ते एकत्र दिसत नाहीत. तालुक्यातील अर्धवट राहिलेल्या कामासाठी ते शासनाकडे पाठपुरावा करीत नाहीत. तालुक्यातील लोकप्रतिनिधीच प्रकल्पांबाबत गंभीर नसतील तर या प्रकल्पासाठी दाद मागायची कुणाकडे, असा प्रश्न जनतेला पडला आहे.