उसाला ३,५०० पहिला हप्ता द्या:रघुनाथदादा पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2018 10:48 PM2018-10-14T22:48:19+5:302018-10-14T22:48:31+5:30
सातारा : ‘फितूर राजू शेट्टींसारख्या लोकांना हाताशी धरून अच्छे दिन वाल्या या सरकारने शेतकऱ्यांचे नुकसान केले आहे. नीरव मोदी, ...
सातारा : ‘फितूर राजू शेट्टींसारख्या लोकांना हाताशी धरून अच्छे दिन वाल्या या सरकारने शेतकऱ्यांचे नुकसान केले आहे. नीरव मोदी, विजय मल्ल्या हे कर्ज बुडवून गेले तरी बँका बुडाल्या नाहीत. मग लाखात कर्ज असून शेतकरी काळजीने आत्महत्या करत आहेत. अशावेळी रडत बसू नका तर लढण्यासाठी तयार राहा. हमीभाव नसल्याने आता कर्ज बुडवा,’ असा सल्ला शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी दिला. दरम्यान, यावेळी त्यांनी उसाला ३,५०० रुपये पहिला हप्ता द्यावा, असे स्पष्ट केले.
क्षेत्रमाहुली, ता. सातारा येथील शेतकरी संघटनेच्या ऊस परिषदेत ते बोलत होते. क्रांतिसिंह नाना पाटील ब्रिगेडचे शिवाजीराव नांदखिले, शंकरराव गायकवाड, महिला आघाडी राज्यध्यक्षा वंदना माळी, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष बाळासाहेब पठारे, संघटनेचे कार्याध्यक्ष कालिदास आपेट, जिल्हाध्यक्ष विकास जाधव, टी. के. आढाव यांची प्रमुख उपस्थिती होती.
रघुनाथदादा म्हणाले, ‘रिकव्हरीचा पाया बदलून तुमचा खिसा कापला जात आहे. गुजरातमध्ये टनाला ४,७४१ रुपये भाव आहे. तुमच्या उसाला १,५०० रुपये कमी देत आहेत. एकरकमी एफआरपी मिळावी, अशी मागणी आहे. ३,५०० रुपये पहिला हप्ता मिळण्याची गरज आहे. उपपदार्थातील ५० टक्के नफा मिळाला पाहिजे. त्यासाठी सर्वांनी मिळून लढा उभा केला पाहिजे. ऊस बिलातून अनेक कारणांनी पैसे कापले; पण भामट्या कारखानदार व सरकारने या ठेवी बुडविण्याचे पाप केले आणि ठेवींचे रुपांतर शेअर्समध्ये केले. डिव्हिडंट नसल्याने शेतकºयांचे नुकसान आणि कारखान्याचे शेअर भांडवल वाढले आहे.
आपेट म्हणाले, ‘सदाभाऊ खोत यांची २३ रोजी ऊस परिषद होत असून, त्याला मुख्यमंत्री येणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित ऊस परिषद कशासाठी? एफआरपीचे २५५ कोटी रुपये शेतकºयांना शासनाकडून येणे आहे. ती अगोदर मिळणे आवश्यक आहे.’
एफआरपीचे तुकडे करणाºयांचा निषेध...
‘मागीलवेळी शेट्टी, सदाभाऊ खोत यांनी एफआरपीच्या वर २०० रुपये घेऊन आंदोलन मागे घेतले. केवळ रघुनाथदादा पाटील यांनी शेवटपर्यंत ३,५०० रुपयांच्या एफआरपी वर ठाम राहिले. त्यामुळे एफआरपीचे तुकडे करणाºयांचा आम्ही निषेध करतो. शेतकºयांची वीज कपात होत असताना सत्ताधारी आणि विरोधक हे गप्प बसत आहेत, याचा आम्ही निषेध करतो, असे शिवाजीराव नांदखिले यांनी स्पष्ट केले.