Crime News: पोलिसांना खोटी माहिती देणे भोवलं; एकावर गुन्हा
By दत्ता यादव | Published: October 19, 2022 03:35 PM2022-10-19T15:35:55+5:302022-10-19T15:36:16+5:30
नियंत्रण कक्षातील पोलीस मदत क्रमांक डायल ११२ या नंबरवर फोन करुन गांजा विक्री सुरू असल्याची माहिती दिली. घटनास्थळी पोलीस चौकशीसाठी पोहोचल्यानंतर तेथे अशाप्रकारे कोणतेही कृत्य होत नसल्याचे समोर आले.
सातारा : पोलिसांना खोटी माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल करणे एकाला चांगलंच भोवलं आहे. पोलिसांनी तातडीने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन एकावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. संबंधिताने दारूच्या नशेत हा प्रकार केला असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.
किरण रामसमर्थ शेडगे (वय ४०, रा. शेंद्रे, ता. सातारा) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, नियंत्रण कक्षातील पोलीस मदत क्रमांक डायल ११२ या नंबरवर अनोळखीने तीन वेळा फोन केला. शेंद्रे चौक बसस्टॉप येथे गांजा विक्री सुरू आहे अशी माहिती पोलिसांना देण्यात आली. तिन्हीही वेळा पोलीस तेथे चौकशीसाठी पोहोचल्यानंतर तेथे अशाप्रकारे कोणतेही कृत्य होत नसल्याचे समोर आले.
यानंतर पोलिसांनी डायल ११२ वर आलेल्या फोन नंबरद्वारे संबंधिताचा शोध घेतला असता हा नंबर किरण शेडगे याचा असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी तातडीने किरण शेडगेवर पोलिसांना खोटी माहिती दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. याबाबत पोलीस नाईक हिमाकांत शिंदे यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून हवालदार विक्रम हसबे हे अधिक तपास करीत आहेत.