‘हिरवा कंदील’ दिलात;

By admin | Published: July 8, 2014 11:47 PM2014-07-08T23:47:01+5:302014-07-09T00:03:02+5:30

पण ‘लाल दिवा’ कधी ?कृष्णा खोरे उपाध्यक्ष निवड : फलटणकरांचे मुख्यमंत्र्यांसमोर गाऱ्हाणे

Giving 'Green Lantern'; | ‘हिरवा कंदील’ दिलात;

‘हिरवा कंदील’ दिलात;

Next

कऱ्हाड : बाबा..! रणजित निंबाळकरांना ‘कृष्णा खोरे’च्या उपाध्यक्षपदाबाबत आपण हिरवा कंदील दिलात. आम्ही फलटणमध्ये फटाकेही फोडले अन् गुलालही उधळला; पण पंधरा दिवस झाले तरी अधिकृत पत्र नाही, घोषणा नाही. आता त्यांना लाल दिवा कधी देणार? असे गाऱ्हाणे फलटणच्या कार्यकर्त्यांनी आज मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर मांडले. यावर जरा धीर धरा असे उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिले.
‘कृष्णा खोरे’च्या उपाध्यक्षपदी रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांचे नाव निश्चित झाल्याची वार्ता २२ जुनला फलटणमध्ये धडकली. मग काय त्यांच्या उत्साही कार्यकर्त्यांनी लगेच फटाक्यांची आतिषबाजी आणी गुलालाची उधळण करीत दिवाळी साजरी केली; पण पंधरा दिवस लोटले तरी त्यांना पेढे वाटायची संधी मिळेना. कारण अजून हातात निवडीचे अधिकृत पत्र कुठेय..!
आज मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण कऱ्हाड दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान सकाळी त्यांच्या निवासस्थानीच फलटणच्या काही निवडक कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री चव्हाणांची भेट घेतली. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्यासमोरच आपल्या भावना त्यांनी मांडल्या. फलटणला ताकद देण्यासाठी आपण ‘कृष्णा खोरे’चे उपाध्यक्षपद देण्याचा निर्णय घेताय; पण ते उपाध्यक्षपद लवकर दिले तर त्याचा विधानसभेला फायदा होईल, अशी मते त्यांनी मांडली. त्यावर स्मितहास्य करीत जरा धीर धरा, असा सबुरीचा सल्ला मुख्यमंत्र्यांनी कार्यकर्त्यांना दिला, एवढेच!
सुशांत निंबाळकरही मुख्यमंत्र्यांच्या भेटीला
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष सुशांत निंबाळकर यांना दोन दिवसापूर्वी फलटण येथे त्यांच्या घरात घुसून राष्ट्रवादीच्याच काही नगरसेवकांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. त्यामुळे फलटण येथील राष्ट्रवादीतील राजकीय घडामोडी वाढल्या आहेत. संबंधितांवर गुन्हा नोंद होऊन पोलीस कारवाई झाली असली तरी या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, म्हणून सुशांत निंबाळकर यांनी आज कऱ्हाड दौऱ्यावर असणाऱ्या मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची शासकीय विश्रामगृहावर भेट घेतली. यावेळी रणजित नाईक-निंबाळकर त्यांच्यासोबत होते. सुशांत निंबाळकर जखमी स्थितीत त्याठिकाणी आल्याने सर्वांचे लक्ष त्यांच्यावर केंद्रित झाले होते.
...तर नाईक-निंबाळकरांची हॅट्ट्रिक
रणजित नाईक-निंबाळकरांना कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्षपद अधिकृत मिळाले तर नाईक-निंबाळकरांची ही हॅट्ट्रिक ठरणार आहे. यापूर्वी १९९५ ला तत्कालीन आमदार रामराजे नाईक-निंबाळकर, तर १९९८ ला तत्कालीन खासदार हिंदुराव नाईक-निंबाळकरांनी हे पद भूषविले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Giving 'Green Lantern';

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.