देविका बनल्यात ‘देवदूत’ : ग्लॅमरस दुनियेतील ‘ती’ कोरोनाच्या लढाईत! क-हाडच्या कृष्णा रूग्णालयात कार्यरत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2020 01:08 PM2020-04-28T13:08:52+5:302020-04-28T13:17:11+5:30
ग्णालयात येणारा रूग्ण हा नेमका कसा आहे? त्याला कोणती लक्षणं आहेत? हे माहित नसतं. त्यामुळे प्रत्येक डॉक्टरला काळजीने काम करावे लागते. डोळ्यावाटे कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता जास्त आहे. डोळ्यातील अश्रूही याला निमंत्रण देवू शकतात. डोळे येणे हे सुद्धा त्याचे लक्षण आहे.
प्रमोद सुकरे
क-हाड : कोरोनाच्या संकटानं आज प्रत्येकाला घरात बसविले आहे. याला छोटा-मोठा असा फरक राहिलेला नाही. ‘ग्लॅमर’ दुनियाही या संकटाला अपवाद नाही. मात्र, गायन क्षेत्रात मोठं नाव असलेली पुण्याची देविका कºहाडात कोरोना लढाईत सहभागी होवून रूग्णसेवा करीत आहे. तीच्या या धाडसाचं, कार्याचं कौतुक करावं तेवढं थोडच.
डॉ. देविका दामले या संगीत विशारद आहेत. वयाच्या पाचव्या वर्षापासून त्यांच्या गायनाच्या करिअरला सुरूवात झाली. पुणे आकाशवाणीवर बालगायिका म्हणून त्यांनी स्वत:ची ओळख तयार केली.
संगीतकार अनिल मोहिले यांनी त्यांचा आवाज ऐकल्यानंतर ख-या अर्थाने देविकाच्या गायनाच्या करिअरला सुरूवात झाली. वयाच्या चौदाव्या वर्षापासून त्यांनी व्यावसायिक गायिका म्हणून सुरूवात केली. आज त्यांनी प्लेबॅक सिंगर म्हणून स्वत:ची ओळख तयार केली असून पंडीत हृदयनाथ मंगेशकर, कल्याणजी, आनंदजी, अवधुत गुप्ते, बप्पी लहरी आदींबरोबर त्यांनी गायन केले आहे. त्याबरोबरच नेत्रचिकीत्सामध्ये पदवी घेत असलेल्या देविका सध्या क-हाडच्या कृष्णा हॉस्पिटलमध्ये डॉक्टर म्हणून कार्यरत आहेत.
गायन आणि वैद्यकीय ही करिअरची दोन भिन्न क्षेत्र असली तरी या दोन्ही क्षेत्रांनी माझं करिअर घडवलं, असं डॉ. देविका सांगतात. ‘संगिताबद्दलचे संस्कार माझ्यावर बालवयातच झाले आहेत. आई-वडिल डॉक्टर असुनही त्यांनी संगित कलेवर प्रेम केले. त्यामुळे लहानपणापासूनच संगीत हे माझे मुख्य करिअर बनले. मी पुण्यातच एमबीबीएस पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. हे करत असताना नाट्यगीताचा डिप्लोमा केला. गंधर्व महाविद्यालयातून संगीत विशारद ही पदवी घेतली. सध्या डोळ्यांवरील उपचाराबद्दल क-हाडच्या कृष्णा महाविद्यालयात मी पदव्युत्तर शिक्षण घेत आहे.’
‘कोरोना’बाबत बोलताना डॉ. देविका सांगतात की, हे संकट म्हणजे निसर्गाने आपल्याला झुकवायला शिकविले आहे. माणसातला अहंकार कमी व्हायला याची मदत झाली आहे. रूग्णालयात येणारा रूग्ण हा नेमका कसा आहे? त्याला कोणती लक्षणं आहेत? हे माहित नसतं. त्यामुळे प्रत्येक डॉक्टरला काळजीने काम करावे लागते. डोळ्यावाटे कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता जास्त आहे. डोळ्यातील अश्रूही याला निमंत्रण देवू शकतात. डोळे येणे हे सुद्धा त्याचे लक्षण आहे. त्यामुळे लोकांनी काळजी घेणे महत्वाचे आहे. इतर देशांच्या तुलनेत भारताने परिस्थिती चांगली हाताळली असली तरी नागरिकांनी गाफिल राहून चालणार नाही, असे आवाहनही डॉ. देविका करतात.
संगीत क्षेत्राला वाहून घेतलेला परिवार
डॉ. देविका यांचे वडील डॉ. प्रदीप दामले हे डोळ्यांचे डॉक्टर आहेत. आई डॉ. गौरी दामले या मधुमेह तज्ज्ञ आहेत. तर बहीण डॉ. मोहिका या दंत चिकीत्सक आहेत. आणि हे सगळे संगीतप्रेमी असून त्याची पदवीही त्यांनी प्राप्त केली आहे. तोच वारसा देविका पुढे चालवित आहेत. त्याबरोबरच डॉ. देविका यांना पेंटिंग, एम्रॉयड्री, स्वीमिंग हेदेखील छंद आहेत.
गुरूंना कधीही विसरू शकत नाही!
एमबीबीएस करीत असताना मी दोन पेपरमध्ये असणा-या कालवधीतही व्यावसायिक कार्यक्रम केले आहेत. हे सांगतानाच संगीतकार अनिल मोहिले यांनी एका कार्यक्रमात माझे गाणे ऐकले अन् त्याला चार वेळा ‘वन्समोअर’ दिला. तुझे गाणे कायम ऐकत रहावे, असे ते म्हणाले होते. तो क्षण माझ्या चिरंतन स्मरणात राहिल, असं डॉ. देविका सांगतात. गुरूंना मी कधी विसरू शकत नाही, असेही त्या म्हणाल्या.
गाण्यानं नवी ऊर्जा मिळते
कोरोनाच्या संकटात रूग्णसेवा करताना डॉक्टरांवर प्रचंड ताण आहे. वैद्यकीय क्षेत्रात सध्या मला माझ्या गायनाचाही खूप फायदा होतो. कामाचा ताण आला की मी गाणं गुणगुणत राहते. त्यातून मला नवी ऊर्जा मिळते. लोकांनीही गाणं ऐकत राहिलं पाहिजे. त्यामुळे आपल्यातली नकारात्मकता दूर होण्यास मदत होते, असेही डॉ देविका यांनी आवर्जुन सांगितले.
आमच्याकडे कोरोना संदर्भात आलेल्या रूग्णाची फंडस् एक्झामिनेशची विशेष जबाबदारी आहे. प्रत्येक रूग्णाला औषध देण्यापूर्वी डोळ्याच्या मागच्या पडद्याला काय परिणाम झाला आहे का? याची तपासणी आम्ही करीत आहोत. डॉक्टर धोका पत्करून हे सर्व करताहेत. त्यामुळे लोकांनी कोरोनाचे गांभीर्य ओळखण्याची गरज आहे.
- डॉ. देविका दामले