दुबईतील सातारकरांचे ग्लोबल आमंत्रण!
By Admin | Published: October 18, 2016 12:45 AM2016-10-18T00:45:59+5:302016-10-18T00:45:59+5:30
दुबईत व्यापार जत्रा : २४ ते २६ नोव्हेंबरपर्यंत होणार उद्योजगतेचा जागर
सातारा : पुढाकार घेणं ही सातारकर माणसाची सहजवृत्ती आहे. जगाच्या पाठीवर कुठेही गेली तरी कायम राहते. याचाच प्रत्यय देत काही मराठी युवकांनी दुबईत आयोजित केलेल्या व्यापार जत्रेच्या आखणीत चार सातारकर समाविष्ट झाले आहेत. आखाती देश आणि आफ्रिकी देशांमधील व्यापार वाढविण्यास मराठी उद्योजकांना प्रोत्साहन देणे हा या जत्रेचा उद्देश आहे. या आयोेजनात सातारकर असल्यामुळे दुबईतही सातारकर व्यापाऱ्यांचा नाद घुमणार असे आश्वासक चित्र दिसत आहे.
शिक्षण, व्यापार, कला, मनोरंजन, संस्कृती व साहित्य अशा क्षेत्रांत दुबई व भारतातील संबंध दृढ करण्याच्या उद्देशाने अखिल भारतीय अमिराती मराठी इंडियन (आमी) या संस्थेने अनेक सामाजिक कार्यक्रम राबविले आहेत. यावर्षी संस्थेने आखाती देशात प्रथमच दुबईमधील लघू, मध्यम, कुटीर व हस्तकला विभागांतील मराठी बांधव उद्योजकांना एका व्यासपीठावर एकत्रित करण्यासाठी दि. २४ ते २६ नोव्हेंबर झुबेल पार्क, दुबई येथे महाराष्ट्र उद्योग जत्रेचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती राहुल घोरपडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
घोरपडे म्हणाले, ‘भारत सरकारच्या मेक इन इंडिया योजनेंतर्गत पहिल्या मराठी उद्योजकांच्या जत्रेमध्ये व्यापाऱ्याच्या मोठ्या व नवीन संधी उपलब्ध होणार आहेत. यावेळी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री सुभाष देसाई, सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे, कोरेगाव तालुक्याचे आमदार शशिकांत शिंदे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात महाराष्ट्रातील मराठी उद्योजकांचा सन्मान करण्यात येणार आहे.’ साताऱ्यासह पश्चिम महाराष्ट्रातील खासियत असलेल्या विविध स्टॉलसची येथे मांडणीही करता येणार आहे. मराठी माणसं उद्योग जगतात मागे आहेत, असा सार्वत्रिक समज खोडून काढण्यासाठी या उद्योग जत्रेचे आयोजन केले आहे, अशी माहिती मुळचे सातारकर असणारे प्रोटोकॉल हेड विजयेंद्र सुर्वे यांनी दिली. (प्रतिनिधी)
अशी आहे टीम
अखिल भारतीय अमिराती मराठी इंडियन अर्थात ‘आमी’ची स्थापना मार्च २०१६ रोजी झाली. याची स्थापना संतोष कारंडे यांनी केली. यात मुख्यकार्यकारी अधिकारी म्हणून नितीन साडेकर, सरव्यवस्थापक म्हणून राहुल घोरपडे, उपसरव्यवस्थापक म्हणून किरण पवार, प्रोटोकॉल हेड म्हणून विजयेंद्र सुर्वे, सहायक व्यवस्थापक म्हणून अमर घोरपडे, महिला विभागात इव्हेंट मॅनेजर म्हणून रेवती कारंडे, नेहा साडेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सातारकरांसाठी लाईव्ह माहिती
या उद्योग जत्रेत होणाऱ्या अनेक घडामोडींचे लाईव्ह दर्शन सातारकरांना मिळावे व सातारकर सातासमुद्रापार पोहोचावेत या उद्देशाने ६६६.ेंँं१ं२ँ३१ं४८िङ्मॅ्नं३१ं.ूङ्मे या वेबसाईटवर उद्योग जत्रेतील अपडेट दिल्या जाणार आहेत. सातारकरांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सातारकर विजयेंद्र सुर्वे व राहुल घोरपडे यांनी केले आहे.