बाप्पांपुढे दानपेटीऐवजी ज्ञानपेटी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2019 11:42 PM2019-09-07T23:42:17+5:302019-09-07T23:42:21+5:30
प्रगती जाधव-पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : उत्सव काळात धार्मिकतेबरोबरच आधुनिकतेचा ध्यास घेऊन विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी उपयुक्त उपक्रम राबविण्याचा ...
प्रगती जाधव-पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : उत्सव काळात धार्मिकतेबरोबरच आधुनिकतेचा ध्यास घेऊन विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी उपयुक्त उपक्रम राबविण्याचा निश्चय जकातवाडी ग्रामपंचायतीने केला. त्यानुसार दानपेटीऐवजी मंडळांपुढे ज्ञानपेटी ठेवण्याचा अनोखा उपक्रम राबविला. त्याला ग्रामस्थांसह गणेश भक्तांनीही प्रतिसाद दिला.
गणरायाच्या दर्शनाला गेल्यानंतर दानपेटीत पैसे स्वरुपात दान करतो. तेच दान आपण विद्यार्थ्यांच्या शालेय उपयोगी वस्तू अथवा पैसे स्वरुपात या ज्ञानपेटीत टाकावे, अशी संकल्पना गावातील गणेशोत्सव मंडळांपुढे मांडण्यात आली. या मंडळांपुढेही पहिल्यांदा आलेल्या या संकल्पनेला उत्साही कार्यकर्त्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला. सार्वजनिक मंडळांनी बाप्पांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केल्यानंतर समोरील दानपेटीचे रुपांतर ज्ञानपेटीत केले. गणेश दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांना मंडाळाच्या कार्यकर्त्यांनी या ज्ञानपेटीविषयी अधिकची माहितीही दिली. भक्तही आपल्या इच्छेने यात पैशांसह शालेय साहित्य दान करत आहेत.
गणेशोत्सवानंतर जमा झालेले सर्व शालेय उपयोगी वस्तूंचे वाटप जकातवाडी जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुलांना करण्यात येणार आहे. उत्सव काळात धर्माच्या नावावर निव्वळ उधळपट्टी करणाºया अनेकांसाठी जकातवाडी ग्रामपंचायतीचा उपक्रम अनुकरणीय असाच आहे.
ज्ञानपेटीत पेन्सिल,
पेन अन् वहीही!
जकातवाडीत एकूण १३ गणेशोत्सव मंडळे आहेत. या सर्व मंडळांनी आपल्या मंडळातील दानपेटी काढून तिथे ज्ञानपेटी ठेवली आहे. या ज्ञानपेटीत येणाºया भक्तांकडून पेन, पेन्सिल, वही अशा शोलय उपयोगाच्या वस्तू दान म्हणून देण्यात येत आहेत..
जिल्हा परिषद शाळांना मदत
ज्ञानपेटीत मिळणाºया निधीतून जकातवाडी ग्रामपंचायत हद्दीतील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.