बैलगाड्यांसह शेळ्या-मेढ्यांचा मोर्चा
By Admin | Published: May 31, 2017 11:27 PM2017-05-31T23:27:23+5:302017-05-31T23:27:23+5:30
बैलगाड्यांसह शेळ्या-मेढ्यांचा मोर्चा
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : सरसकट सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी, शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळावा, यासह विविध मागण्यांसाठी ‘किसान क्रांती’ संघटनेच्या नेतृत्वाखाली बैलगाड्यांसह शेळ्या-मेढ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर बुधवारी दुपारी मोर्चा काढण्यात आला.
या मोर्चामध्ये महिलांचाही सहभाग लक्षणीय होता. मोर्चाच्या पुढे वाजंत्री होते. वाजंत्रीच्या सुरात शेतकऱ्यांचा मोर्चा निघाला होता. पाठीमागे बैलगाडी, शेळ्या, मेढ्यांचे कळप होते. एका रांगेत हा मोर्चा निघाला होता. या आगळ्या-वेगळ्या मोर्चाकडे पाहून रस्त्यारून ये-जा करणारे कुतूहलाने पाहत होते. त्यामुळे साहजिकच शेतकऱ्यांचाही घोषणा देण्यासाठी उत्साह वाढत होता. ‘शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे, शेतकऱ्यांच्या मालाला
भाव मिळालाच पाहिजे,’ अशा घोषणा
देत शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर दणाणून सोडला.
एक जूनपासून शेतकरी बेमुदत संपावर
जात आहेत. या पार्श्वभूमीवर हा मोर्चा काढण्यात आला.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा पोहोचल्यानंतर वाजंत्रीचा सूर ऐकून कार्यालयातील कर्मचारीही हा मोर्चा पाहण्यासाठी बाहेर आले. बुधाजी मुळीक हे पोटतिडकीने मागण्या शेतकऱ्यांपुढे मांडत असताना शेळ्या, मेढ्यांही जागच्या जागी शांत उभ्या राहिल्या होत्या. शेतकऱ्यांची ही अनोखी शिस्त पाहून अनेकांनी या मोर्चाला पाठिंबा दिला.