पश्चिम भागात अवतरलाय माणसांमधील ‘देव’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:38 AM2021-07-31T04:38:39+5:302021-07-31T04:38:39+5:30

वाई : कोंढावले - देवरुखवाडी, जांभळी आणि जोर येथे झालेल्या भूस्खलनाला सात दिवस झाले. या दुर्घटनेत चारजणांचा मृत्यू झाला, ...

The 'God' among the people incarnated in the West | पश्चिम भागात अवतरलाय माणसांमधील ‘देव’

पश्चिम भागात अवतरलाय माणसांमधील ‘देव’

Next

वाई : कोंढावले - देवरुखवाडी, जांभळी आणि जोर येथे झालेल्या भूस्खलनाला सात दिवस झाले. या दुर्घटनेत चारजणांचा मृत्यू झाला, पशुधन गाडले गेले. हक्काची घरे बेचिराख झाली, संसार मातीमोल झाला अन् सोन्यासारख्या जमिनीचा अक्षरशः ‘चिखल’ झाला. निराधार, बेघर झालेल्या इथल्या जनतेकडे आता शहर व तालुक्यातून मदतीचा ‘पूर’ वाहू लागला आहे. माणसातील ‘देव’ इथं अवतरल्याचे चित्र अनुभवायला येत आहे.

अस्मानी संकटाने पश्चिम भागाचा चेहरामोहराच बदलून गेला आहे. निसर्गाचे वरदान लाभलेला हा परिसर काळवंडलाय. दुःखाचे धूर सर्वदूर पसरलेत. सह्याद्रीच्या कुशीत वसलेली इथली टुमदार गावं, वाड्या-वस्त्यांवर स्मशानशांतता पसरली आहे. इथल्या माणसांना दिवस-रात्र मृत्यू आजूबाजूला घोंगावताना दिसतोय.

जोरची माय-लेकरं अजून सापडली नाहीत. अख्ख गावं चिंतातूर आहे. काय त्यांनी पाप केलं होतं? निसर्गाला देव मानणाऱ्या या भूमीत अघटित घडलं कसं? असा प्रश्न इथल्या प्रत्येकाला पडला आहे.

अतिवृष्टीचे ‘ते’ चार दिवस जीव मुठीत घेऊन जगणाऱ्या या कष्टकऱ्यांना पिण्यासाठी ना स्वच्छ पाणी आहे ना खायला आहे. कधीही मृत्यू कवटाळेल, या भीतीने त्यांची तहान-भूक हरवली होती. आता कुठे ही लोकं बोलती झाली आहेत. त्या दिवसांचा क्षण ना क्षण ते सांगताहेत.

संसार उघडे पडलेल्या या ‘जीवांना’ आपण एकटे पडलो नाही, आपल्याला सावरायला आहे कोणीतरी येतंय या जाणीवेने ते सर्वजण सुखावले होते.

वाईच्या दिशेने तरुण, आबाल- वृद्ध गटागटाने येत आहेत. सोबत खाण्यापासून सर्व काही आणताहेत. सर्व काही भारावून टाकणारं. खचलेल्या माणसाला पुन्हा ‘मनाने’ उभं करण्याचं ‘पुण्य’ आज अनेक संघटनांचे, राजकीय पक्षांचे तरुण करताना दिसत आहेत. माणुसकी अजून जिवंत आहे, यांचा प्रत्यय आज पश्चिम भाग अनुभवतोय.

रविवारी पावसाचा जोर मंदावला. एनडीआरएफ पथकाच्या माध्यमातून जोरला प्रशासकीय यंत्रणाही पोहोचली. पाठोपाठ सामाजिक संघटनेचे कार्यकर्तेही अन्न, धान्य, पिण्याचे पाणी, सर्व जीवनावश्यक वस्तू घेऊन पोहोचले. सह्याद्री ॲकॅडमी, रुद्रशंभू प्रतिष्ठान, हिंदुस्थान प्रतिष्ठान, आरपीआयचे कार्यकर्ते, रोटरी क्लब, सर्वोदय सेवा ट्रस्ट, काळेश्वरी चॅरिटेबल ट्रस्ट या सामाजिक संस्था, संघटना याशिवाय अनेक दानशूर व्यक्तींनी इथे मदत पोहोचवली आहे. जगण्याची खात्री नसलेल्या इथल्या माणसाला या सर्वांनी जी मदत केली आहे त्याची पैशात किंमत होऊ शकत नाही.

सरकारची मदत मिळेल तेव्हा मिळेल पण स्वखर्चाने माणसं उभं करण्याचे महत्तम काम पुरोगामी विचारांचा वाई तालुका करत आहे. या तमाम तरुणांना, संघटना, राजकीय पक्षाचे कार्यकर्ते-पदाधिकारी साऱ्यांना सलाम..!

चौकट...

वाईतील डॉक्टर्सही उतरले सेवेसाठी

या परिसरातील आजारी रूग्णांना दवाखान्यात पोहोचणे अवघड झाले आहे. ही अडचण लक्षात घेऊन वाईतील डॉ. प्रकाश कासुर्डे, डॉ. शैलेश देढे, डॉ. योगेश फरांदे , डॉ. गजानन गव्हाणे, डॉ. दिनेश हरियाल, डॉ. नीलेश देखमुख, डॉ. सागर धोत्रे, डॉ. केतन शहा, डॉ. पवनकुमार सोनावणे, डॉ. संदेश शिंदे, डॉ. रमेश जाधव यांनी दुर्घटनाग्रस्त गावात जाऊन देवरुखवाडीसह परिसरातील पाचशेहून अधिक ग्रामस्थांची मोफत तपासणी करताना त्यांना मोफत औषधेही दिली. यानंतरही उर्वरित गावात मोफत उपचार केले जाणार आहेत.

फोटो... अतिदुर्गम जोर गावात असंख्य अडचणींचा सामना करत सामाजिक कार्यकर्ते अन्न-धान्य सोबत घेऊन पोहोचत आहेत.

Web Title: The 'God' among the people incarnated in the West

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.